संभाजीनगर येथील महिलेचा विनयभंग करणार्‍या साहाय्यक पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा !

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांची गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी !

संभाजीनगर – शहर पोलीस दलातील साहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर शहरात ढुमे यांच्याविरुद्ध संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तथापी ढुमे यांना निलंबित करून चालणार नसून त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २० जानेवारी या दिवशी पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.

नीलम गोर्‍हे यांनी पत्रात म्हटले आहे की, ढुमे यांचा हा पहिला प्रकार नसून यापूर्वीही नगर येथे त्यांनी असेच प्रकार केले आहेत. या संदर्भात नगर येथील पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांची कार्यालयीन चौकशीही लावली होती. त्याचवेळी ढुमे यांचे संभाजीनगर येथे स्थानांतर झाले आहे. त्यामुळे महिलांशी अश्लील आणि असभ्य वर्तन करणार्‍या अधिकार्‍यांना पदावर रहाण्याचा कोणताही अधिकार नाही. यास्तव ढुमे यांना नुसते निलंबन करून उपयोग नाही, तर त्यांना तात्काळ बडतर्फ करावे.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? त्यांना प्रथमच बडतर्फ का केले नाही ?