जिजाऊ निर्माण झाल्या, तरच शिवराय जन्माला येतील ! – सौ. पुष्पा चौगुले, हिंदु जनजागृती समिती

रायगड येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी !

सौ. पुष्पा चौगुले

रायगड, १४ जानेवारी (वार्ता.) – प्रत्येक स्त्रीने धर्माचरण केले पाहिजे. हिंदु धर्मशास्त्रातील प्रत्येक धार्मिक कृती मागील अध्यात्मशास्त्र स्वतः जाणून घेऊन आपल्या मुलांना सांगितले पाहिजे, तरच मुले धर्माचरण करतील. प्रत्येक स्त्रीने जिजाऊ व्हावे, तरच हिंदवी स्वराज्याची म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊ शकतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. पुष्पा चौगुले यांनी केले.

स्वराज्य प्रतिष्ठान (चिंचवली, गोहे), हिंदु जनजागृती समिती आणि वेद सह्याद्री या संघटनांनी एकत्रितरित्या खालापूर तालुक्यातील चिंचवली येथे १२ जानेवारी या दिवशी राजमाता जिजाऊ जयंती आयोजित केली. या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सौ. पुष्पा चौगुले यांनी वरील प्रतिपादन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. १२० राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या वेळी ग्रामस्थांनी सन्मानचिन्ह देऊन व्याख्यात्यांचा सन्मान केला.

मुलांवर चांगले संस्कार करून स्त्रियांनी राष्ट्रकार्यात योगदान द्यावे. ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रसाद वडके

जिजाऊंनी केलेल्या संस्कारांमुळे बाळ शिवबाचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. रामायण, महाभारत यांतील कथा सांगून जिजाऊंनी शिवरायांना संस्कारीत केले. वर्तमानकाळात स्त्रिया स्वत:च्या मुलांवरती असे संस्कार करतात का ? सद्यस्थितीत आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्यांचे अंधानुकरण चालू आहे. स्त्रियांनी मुलांवर चांगले संस्कार करून राष्ट्रकार्यात योगदान द्यावे.

वैशिष्ट्यपूर्ण

१. कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी त्यांच्या मुलांकडून नियमित १५ मिनिटे नामजप करून घेण्याचा निश्चय केला.
२. कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्या कार्याची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.