जगभरात मराठी भाषा पोचवण्‍यासाठी ‘पोर्टल’ उभे करणार ! – सुधीर मुनगंटीवार

मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

पिंपरी – जगभरातील बोलीभाषांमध्‍ये मराठी १० व्‍या क्रमांकावर आहे. मराठी भाषा संस्‍कृतिक शक्‍ती, ऐतिहासिक वारसा सांगणारी, तसेच प्रचंड वाङ्‍मय, अध्‍यात्‍म देणारी आहे. ही शक्‍ती विश्‍वकल्‍याणासाठी आहे. ही भाषा ज्ञानाची व्‍हावी; म्‍हणून मराठीच्‍या श्रेष्‍ठत्‍वासाठी आणि ती जगभरात पोचण्‍यासाठी राज्‍य सरकार ‘पोर्टल’ उभे करणार आहे, अशी घोषणा महाराष्‍ट्राचे सांस्‍कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. जागतिक मराठी अकादमी आणि पिंपरीतील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ आयोजित ‘शोध मराठी मनाचा २०२३’ या १८ व्‍या जागतिक मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उच्‍च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, गोव्‍याचे सांस्‍कृतिक मंत्री गोविंद गावडे, माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, यांच्‍यासह संमेलनाचे अध्‍यक्ष, स्‍वागताध्‍यक्ष, अकादमीचे अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष, अमेरिकेतील बृहन् महाराष्‍ट्र मंडळाचे अध्‍यक्ष आदी उपस्‍थित होते.

‘मराठी पाऊल पडते पुढे’ या पद्धतीने आपल्‍याला काम करायचे आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. ‘मराठी माणसाने जगात पुढे जाण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच त्‍याला पाठिंबा देण्‍याची व्‍यवस्‍था केली पाहिजे’, असे विचार चंद्रकांत पाटील यांनी व्‍यक्‍त केले. ‘जीवनात पुढे जायचे असेल, तर मातृभाषा महत्त्वाची आहे’, असे गोविंद गावडे यांनी सांगितले.