नागपूर, १० जानेवारी (वार्ता.) – ‘राष्ट्र आम्हाला सर्वकाही देते, आम्हीही राष्ट्राला काही देणे शिकले पाहिजे. देव आपल्याला सर्वकाही देतो, आपणही त्यांना काही देण्यास शिकले पाहिजे’, या उक्तीनुसार सर्वांनीच देव, राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रती आपले कर्तव्य समजून राष्ट्रकार्यासाठी तन, मन आणि धन अर्पण करायला हवे, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ पिठाचे श्रीनाथ पीठाधिश्वर आचार्य प.पू. जितेंद्रनाथ महाराज यांनी केले.
नागपूर येथे बांधण्यात आलेल्या ‘विश्वमांगल्य सभा संस्थे’च्या केंद्रीय कार्यालयाच्या उद्घाटन समारोहाच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री दत्तात्रय होसबळे, प.पू. श्री जितेंद्रनाथ महाराज, प.पू. सौ. रेणुका मायबाई, डॉ. वृषाली जोशी आणि श्री. प्रशांत हरताळकर हे व्यासपिठावर उपस्थित होते.
श्री. दत्तात्रय होसबळे म्हणाले, ‘‘स्त्रियांनी मनाशी ठरवले, तर ते साध्य करण्याच्या दृष्टीने त्या सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि त्या कार्याला यश मिळतेच.’’ डॉ. वृषाली जोशी यांनी अर्पण गोळा करतांना आलेले अनुभव विशद केले.
विश्वमांगल्य सभा ही महिलांची देशव्यापी मातृ संघटन संस्था आहे. गेल्या १२ वर्षांपासून राष्ट्रचिंतन, समाजचिंतन, परिवारचिंतन आणि मातृचिंतन या कार्यांसाठी ही संस्था कटीबद्ध आहे. भारतातील २७ राज्यांमध्ये विश्वमांगल्य सभेचे कार्य चालू आहे.