बांदोडा, फोंडा येथील कु. गौरी दीपक ढवळीकर बनली वैमानिक (पायलट) !

डावीकडून श्री. दीपक ढवळीकर, कु. गौरी आणि वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर (कु. गौरीचे काका)

फोंडा – महालक्ष्मी, बांदोडा, फोंडा येथील कु. गौरी दीपक ढवळीकर ही इंडिगो विमान आस्थापनात वैमानिक म्हणून निवडली गेली आहे. कु. गौरी ही प्रियोळ मतदारसंघाचे माजी आमदार श्री. दीपक ढवळीकर आणि सौ. लता दीपक ढवळीकर यांची कन्या, तर वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांची पुतणी आहे.

शालेय जीवनापासूनच कु. गौरी हुशार आहे. दहावी आणि बारावी इयत्तांत तिला ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. बारावीनंतर तिने गोव्याच्या ‘एन्.आय.टी.’मधून (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ गोवामधून) कॉम्प्युटर विषयामध्ये इंजिनियरिंग केले. तिचे पायलट बनण्याचे स्वप्न होते. इंडिगो आस्थापनाच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी तिची निवड झाली. यानंतर गोंदिया येथे वैमानिक होण्यासाठी तिने प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली. तिथे तिने व्यावसायिक वैमानिक बनण्याचे शिक्षण घेतले. अमेरिकेतील प्रशिक्षणात सिंगल इंजिन विमान चालवण्याचे शिक्षण घेतल्यानंतर तिने भारतात येऊन डबल इंजिन विमानाचे प्रशिक्षण घेतले आणि आता उत्कृष्ट कामगिरी करत ती व्यावसायिक वैमानिक म्हणून रूजू झाली आहे. हे यश तिने स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवले असल्याचे तिचे वडील श्री. दीपक ढवळीकर यांनी सांगितले.