नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या ८०-१०० एकर भूमीतील लाखो ब्रास मुरुमाचे उत्खनन करून तो समृद्धी महामार्गासाठी वापरण्यात आला; मात्र अद्याप त्याचे पैसे कारखान्याला मिळालेले नाहीत. याची संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांद्वारे चौकशी करण्याची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ३० जानेवारीपर्यंत हा अहवाल सादर करण्यात येईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.
देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जागेतील मुरुम काढल्यामुळे भूमी पेरणीयोग्य राहिलेली नाही. उत्खनन करण्यात आलेल्या गौण खनिजाचा मोबदला कारखान्याला मिळायला हवा, अशी मागणी भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केली होती. यावर उत्तर देतांना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘‘ज्या भागातील गौण खनिजाच्या उत्खननासाठी अनुमती देण्यात आली होती, त्यापेक्षा कितीतरी अधिक भागातील गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले. कारखान्याच्या संचालकांच्या संगनमताने हे करण्यात आले. उत्खननामुळे भूमी नापीक झाली आहे. ही भूमी राज्य सहकारी बँकेकडे तारण होती. त्यामुळे बँकेनेही या प्रकरणात लक्ष का घातले नाही ? याविषयीही चौकशी करण्यात येईल.’’