‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी सातारा येथे २५ डिसेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

वाहनफेरीत सहभागी झालेले धर्मप्रेमी

सातारा – हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे अन् धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करणे, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा येथे २५ डिसेंबर या दिवशी गांधी मैदान, राजवाडा येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, या सभेच्या प्रसारासाठी २२ डिसेंबर या दिवशी वाहनफेरी काढण्यात आली. या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रारंभी शाहूकला मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते हिंदु धर्माचे प्रतीक असणार्‍या धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. यानंतर राजवाडा, पोलीस मुख्यालय, पोवईनाका, नगरपालिका, समर्थ मंदिर, मंगळवार तळेमार्गे शाहूपुरी चौक येथे वाहनफेरीची समाप्ती झाली. फेरीच्या कालावधीत पोवईनाका येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजवाडा येथे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या मूर्तीस हार अर्पण करण्यात आला. विविध चौकांमध्ये फेरीचे स्वागत करण्यात आले.

क्षणचित्र : फेरीत असणारे भगवे ध्वज, धर्माभिमानी हिंदूंनी परिधान केलेले भगवे फेटे, फेरीत देण्यात आलेल्या हिंदुत्व जागृत करणार्‍या घोषणा यांमुळे सातारा शहर भगवेमय झाले होते. या वेळी जयतु जयतु हिन्दु राष्ट्रम, भारतमातेचा विजय असो, हिंदु एकजुटीचा विजय असो, हिंदूंनो जागे व्हा, वन्दे मातरम् यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या.

फेरीच्या समारोपप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी उपस्थितांना संबोधित करून २५ डिसेंबर या दिवशी होत असलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. २५ डिसेंबरला होणार्‍या सभेत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, रणरागिणी शाखेच्या सौ. भक्ती डफळे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे महाराष्ट्र अधिवक्ता संघटक नीलेश सांगोलकर हे वक्ते सभेत मार्गदर्शन करणार आहेत. या सभेच्या ठिकाणी क्रांतीकारकांविषयी माहिती देणारे फलक, हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन, तसेच हिंदुमध्ये जागृती करणार्‍या ग्रंथांचे अन् हिंदूंना धर्मशिक्षण देणार्‍या विविध ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

विशेष

सभेसाठी सातारा परिसरातील अनेक गावांमध्ये प्रसार चालू असून १ मास विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. कोपरा बैठका यांसमवेत भित्तीपत्रके, हस्तपत्रके, फलकलेखन, होर्डिंग, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करत आहेत.