इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होणार्‍या मालदीवमधील तरुणांना अटक

  • डॉ. झाकीर नाईकच्या भाषणांमुळे झाले ‘प्रभावित’

  • चौकशीसाठी भारताचे एन्.आय.ए.चे पथक मालदीवला जाणार

माले (मालदीव) – भारतातून पसार झालेला आणि जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा डॉ. झाकीर नाईक याने मालदीवमधील मुसलमान तरुणांना त्याच्या जाळ्यात ओढल्याचे उघड झाले आहे. डॉ. झाकीरच्या भाषणांमुळे ‘प्रभावित’ झालेले मालदीवमधील १०० हून अधिक मुसलमान तरुण इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मालदीवच्या पोलिसांनी नुकतीच इस्लामिक स्टेटच्या १५ आतंकवाद्यांना अटक केली आहे. या सर्वांनी ‘आम्ही डॉ. झाकीरच्या भाषणांचे व्हिडिओ पाहून इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झालो’, असे सांगितले. या आतंकवाद्यांच्या चौकशीसाठी भारताच्या गृह मंत्रालयाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे (‘एन्.आय.ए.’चे) एक पथक मालदीवमध्ये पाठवले आहे.

१. इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये बहुतेक तरुण अमली पदार्थांचे व्यसन करणारे आहेत. ते स्थानिक टोळ्यांमधील गुंड असून काही जण यापूर्वी कारागृहातही जाऊन आले आहेत.

२. मालदीवच्या महिबाधू येथे १७ एप्रिल २०२० मध्ये झालेल्या बाँबस्फोटात १ समुद्री रुग्णवाहिका, ४ जलद गती नौका आणि २ लहान नौका उद्ध्वस्त झाल्या होत्या. याचे दायित्व इस्लामिक स्टेटने स्वीकारले होते.