(म्हणे) ‘ज्या देशात सत्य बोलण्याची क्षमता अल्प होत आहे, तेथे बोलणे महत्त्वाचे होते !’  

इस्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड यांचे चित्रपट आणि भारत यांच्यावर फुकाचे आरोप चालूच !

इस्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड (उजवीकडे)

पणजी (गोवा) – माझ्यासाठी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयी बोलणे आणि राजकीय विधान करणे सोपे नव्हते. मला ठाऊक होते की, ही एक अशी घटना आहे जी देशाशी भयंकरपणे जोडलेली आहे. तिथला (भारतातील) प्रत्येक जण सरकारचे कौतुक करत आहे. मी तिथे पाहुणा होतो, मी इथल्या ज्युरीचा  (परिक्षक मंडळाचा) अध्यक्ष आहे. त्यामुळे मला चांगली वागणूक दिली गेली आणि मी तिथेच त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्यावर टीका केली. चित्रपट पाहिल्यावर मी अस्वस्थ होतो. कालचा संपूर्ण दिवस मी भीतीत घालवला. ज्या देशात मनातले बोलण्याचे किंवा सत्य बोलण्याची क्षमता अल्प होत आहे, त्या देशात कुणी तरी हे बोलणे महत्त्वाचे होते, असे विधान इस्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड यांनी केले.

गोव्यात झालेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये लॅपिड यांनी चित्रपटावर टीका केली होती. त्यांच्या विधानावरून झालेल्या वादानंतर त्यांनी हे विधान केले. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित झालो आहोत. हा चित्रपट म्हणजे त्रस्त करणार अनुभव आहे. हा चित्रपट आम्हाला अश्‍लाघ्य, तसेच प्रचारकी वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणे योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणे आवश्यकच आहे’, असे लॅपिड म्हणाले होते.

संपादकीय भूमिका

भारतात जर व्यक्तीस्वातंत्र्य नसते, तर लॅपिड एव्हाना कुठल्या तरी कारागृहात असते, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! साम्यवाद्यांनी भारताच्या विरोधात जो दुष्प्रचार चालवला आहे, त्याचे लॅपिड हे एक भाग आहेत. हे भारतीय जनता जाणून आहे !