मेरठ येथे मंदिरात तोडफोड करणारा आरोपी कह्यात

  • देवतांच्या मूर्तींचीही तोडफोड

  • हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन

मेरठ येथे मंदिरात तोडफोड

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील श्री शनिदेवाच्या मंदिरात घुसून मंदिरांची तोडफोड करणार्‍या, तसेच मूर्तींना हानी पोचवणार्‍या आरोपीला पोलिसांनी अटक केली. २३ नोव्हेंबर या दिवशी ही घटना घडली. पोलिसांनी त्याला अटक केली असल्याचे सांगितले जात आहे.

या मंदिरातील पुजारी २३ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता मंदिरात पोचले असता त्यांना तेथील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे, तसेच मंदिरातील श्री शनिदेवासह श्री गणपति, तसेच अन्य देवतांच्या मूर्तींची हानी केल्याचे निदर्शनास आले. या मूर्तींचे व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळांवर प्रसारित झाल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मंदिराजवळ एकत्र आले. यानंतर सर्वांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

(म्हणे) ‘आरोपीने नशेत हे कृत्य केले !’ – पोलीस अधीक्षक

यानंतर मेरठचे पोलीस अधीक्षक पियूष सिंह यांनी या प्रकरणी एका संशयिताला कह्यात घेतल्याची माहिती हिंदुत्वनिष्ठांना देत त्याने हे कृत्य नशेत केल्याचे सांगितले. (‘नशेत केवळ हिंदूंच्याच मंदिरांची तोडफोड कशी केली जाते ?’, हे पोलीस का सांगत नाहीत ? असे सांगून पोलीस घटनेचे गांभीर्य अल्प करू पहात आहेत, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक काय ? – संपादक) त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू करण्यात आले असून मंदिरात नव्या मूर्ती बसवण्याचे आश्‍वासनही या वेळी सिंह यांनी दिले.

संपादकीय भूमिका

  • कधी मशीद किंवा चर्च यांची तोडफोड झाल्याची घटना घडते का ? हिंदू संघटित नसल्यामुळेच कुणीही त्यांच्या श्रद्धास्थानांवर घाला घालतो ! हे हिंदूंना लज्जास्पद !
  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना कशा घडतात ? अशांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !