पनवेल, २० नोव्हेंबर (वार्ता.) – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य प.पू. अच्युतानंद महाराज (भाऊ बिडवई) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येथील डॉ. मिलिंद जोशी यांच्याकडे २० नोव्हेंबरला भजन आणि भंडारा यांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी घाटकोपर येथील संत प.पू. जोशी बाबा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
या भजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी प.पू. भाऊ बिडवई यांची नात सौ. निधी प्रभुणे, प.पू. जोशी बाबा यांचा मुलगा कु. वेदांत जोशी आणि डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांचे भाऊ श्री. जयंत बोरकर, तसेच गायिका सौ. स्वराली पणशीकर-कुलकर्णी यांनी विविध भजने सादर केली.
या भजनाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांनी ‘भार्या म्हणे सुदाम्यासी’, तर प.पू. जोशीबाबा यांनी ‘आल्या जन्माचे सार्थक कराल का हो’, ही भजने म्हटली. या कार्यक्रमाला अनेक भक्तगण उपस्थित होते.
या वेळी डॉ. मिलिंद जोशी यांनी प.पू. भक्तराज महाराज, त्यांचे गुरु प.पू. अनंतानंद साईश, प.पू. रामानंद महाराज, प.पू. अच्युतानंद महाराज यांच्या छायाचित्रांसमोर नैवेद्य दाखवला. ‘ज्योतसे ज्योत जगाओ’, ही आरती करण्यात आली. यानंतर भंडार्याचे आयोजन करण्यात आले.