आर्थिक मंदी असल्याने चारचाकी, शीतकपाट (फ्रीज) खरेदी करू नका ! – अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची चेतावणी

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस

न्यूयॉर्क – आर्थिक मंदी येत आहे. चारचाकी, शीतकपाट (फ्रीज) खरेदी करू नका, अशी सूचना अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी केली आहे. अब्जाधीश जेफ बेझोस यांनी ग्राहकांना त्यांची रोकड सुरक्षित ठेवण्याचा आणि सुट्टीच्या काळात अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकी वृत्तवाहिनी ‘सी.एन्.एन्.’ला दिलेल्या मुलाखतीत बेझोस म्हणाले की, आगामी आर्थिक मंदीची स्थिती लक्षात घेता, अमेरिकन कुटुंबांनी चारचाकी, शीतकपाट (फ्रीज) यांसारख्या मोठ्या किमतीच्या वस्तू खरेदी करणे टाळले पाहिजे. ‘जर तुम्ही अविवाहित असाल आणि तुम्ही मोठा ‘टीव्ही स्क्रीन’ विकत घेण्याचा  विचार करत असाल, तर आता थांबा आणि ते पैसे स्वत:कडे ठेवा आणि काय होते ते पहा’, असेही ते पुढे म्हणाले.

बेझोस म्हणाले, ‘‘मी माझ्या १२४ अब्ज डॉलरच्या एकूण संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान करणार आहे. माझ्या संपत्तीचा काही भाग हवामान पालटाशी लढण्यासाठीही मी दान करणार आहे. तसेच त्यांतील काही भाग मानवतेला एकत्र आणू शकतील, अशा लोकांना पाठिंबा देण्यासाठी खर्च करणार आहे.’’