मराठवाडा येथे गेल्या ४ वर्षांत ४५० कोटी रुपयांचा टँकर घोटाळा !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

संभाजीनगर – मराठवाडा येथे वर्ष २०१८ ते २०२२ या कालावधीत ४५० कोटी रुपयांचा टँकर घोटाळा झाला आहे, असा आरोप बीड येथील आमदार संदीप क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनात केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही याचे समर्थन केले, तर पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाडा येथील प्रत्येक तालुक्यात २ लेखापरीक्षक आणि १ अव्वल कारकून, प्रत्येक जिल्ह्यासाठी १ नोडल अधिकारी, अशा एकूण २३६ जणांची नियुक्ती केली आहे. त्यांनी तातडीने अन्वेषण चालू केले असून २५ नोव्हेंबरपर्यंत प्राथमिक अहवाल अपेक्षित आहे.

पाणीपुरवठा केंद्र ते गावाचे अंतर ४० किलोमीटर असतांना ते ५२ किलोमीटर दाखवले गेले. काही ठिकाणी ‘जी.पी.एस्. ट्रॅकर’ बंद करण्यात आले. काही ठिकाणी ट्रॅकर दुचाकीला बसवले गेले. वर्षानुवर्षे एकाच कंत्राटदाराला ठेका मिळाला. गटविकास अधिकारी कार्यालयातील टँकरचे प्रत्येक देयक पडताळले जाईल. प्रत्येक टँकर किती किलोमीटर चालेल ? कोणत्या गावात किती वाजता पोचेल ? कशाच्या आधारावर देयक निघाले ? याची पडताळणी होईल.

संपादकीय भूमिका

घोटाळ्यातील दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक !