श्रद्धा वालकर यांची निर्दयी हत्या हा लव्ह जिहादचा प्रकार आहे का ? याचे अन्वेषण व्हावे ! – राम कदम, आमदार, भाजप

श्री. राम कदम

मुंबई – वसईतील रहिवासी श्रद्धा वालकर यांच्या निर्दयी हत्येच्या प्रकरणात आरोपी आफताब तिचे धर्मांतर करू इच्छित होता का ? श्रद्धाने त्याला नकार दिला का ? आणि हे लव्ह जिहादचे प्रकरण आहे का ? याचा पालघर आणि देहली पोलिसांनी एक विशेष गट स्थापन करून विविध बाजूंनी याचे अन्वेषण करावे, असे निवेदन घाटकोपर पश्‍चिमचे भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी देहलीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना दिले आहे.

धर्मांध आरोपीने प्रेमाचे नाटक करत हे कुटील षड्यंत्र रचले का ? सामान्य वेतनाची नोकरी करणारा हा युवक एवढे पैसे कुठून मिळवत होता ? आणि हा आरोपी कोणत्या विचारांच्या लोकांच्या संपर्कात होता ? काही समूह अशा युवकांना हे करण्यास साहाय्य करतात का ? आणि यासाठी विदेशातून काही शक्ती यांना साहाय्य करतात का ? आदी सर्व अंगानी याचे अन्वेषण होणे आवश्यक आहे. यामुळेच श्रद्धाच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळेल, असे राम कदम यांनी म्हटले आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांचे घाटकोपरमध्ये आंदोलन

श्रद्धा वालकर यांच्या निर्दयी हत्येची देहली पोलिसांनी लव्ह जिहादच्या बाजूने चौकशी करावी, अशी मागणी करत भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी घाटकोपर येथे नागरिकांसह आंदोलन केले. या आंदोलनामध्ये उपस्थित आंदोलकांनी आरोपी आफताबचा पुतळा जाळून संताप व्यक्त केला.