इजिप्तमध्ये ६ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ‘युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स २०२२’, या नावाने जागतिक हवामान पालट परिषद पार पडत आहे. या परिषदेत मुख्यत्वे करून तापमानवाढ, हवामान पालट आणि त्यामुळे जगासमोर निर्माण होणारे प्रश्न यांवर चर्चा होत आहे. १९७ देशांचे प्रतिनिधी सहभागी असलेल्या या परिषदेत प्रामुख्याने कार्बन उत्सर्जन अल्प करणे, हवामान पालटाचा सामना करण्यासाठी सिद्ध रहाणे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, या सर्व गोष्टींसाठी विकसनशील देशांसाठी निधी उभारणे, कोळशाचा वापर न्यून करणे अन् जागतिक कार्बन बाजाराची स्थापना या संदर्भात प्रत्यक्ष कृती करण्यासाठी भर देण्यात येत आहे. दुसरीकडे या परिषदेसाठी येणारे निमंत्रित हे ३६ खासगी ‘जेट विमानां’द्वारे इजिप्तमध्ये आले आहेत. ‘जेट विमाने’ ही सर्वाधिक ‘कार्बन डायऑक्साईड’ उत्सर्जित करतात. त्यामुळे या ‘जेट’मुळे होणार्या प्रदूषणाचा निषेध करण्यासाठी शेकडो पर्यावरणप्रेमींनी विमानतळ परिसरातच सायकलवर बसून फेरी काढत त्याचा निषेध व्यक्त केला. त्यामुळे ‘परिषदेच्या आगमनाच्या ठिकाणीच जर उत्सर्जनाची काळजी घेतली जात नसेल, तर ही एक परिषद ‘फार्स’ ठरेल आणि कागदी घोडे नाचवण्यापलीकडे त्यातून काहीच साध्य होणार नाही’, असेच म्हणावे लागेल.
तापमानवाढीमुळे उद्भवणार्या समस्या !
गेल्या काही वर्षांपासून अनेक देशांमध्ये अचानक ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडतो, अचानक पूर येतो, तसेच काही देशांमधील काही राज्यांत अचानक मोठ्या प्रमाणात अतीतीव्र उन्हाळा पहायला मिळतो, तर काही देशांमधील जंगलात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागण्याचे प्रकारही घडत आहेत. जागतिक पर्यावरण वाढीमुळे हिमनग वितळण्यासारखे गंभीर प्रकारही होत आहेत. ‘पाकिस्तानमध्ये नुकताच येऊन गेलेला पूर ही त्याचीच एक चुणूक आहे’, असे पर्यावरणतज्ञ आता सांगत आहेत. गेल्या काही वर्षांपासून पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे. यामुळे पर्यावरणाची हानी तर होत आहेच, त्याच समवेत सहस्रो लोकांना विस्थापितही व्हावे लागत आहे.
प्रदूषण वाढण्यामध्ये प्रामुख्याने तेल, वायू, कोळसा अशा इंधनांच्या ज्वलनातून होणारे उत्सर्जन हे प्रमुख घटक आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शास्त्रज्ञांच्या मतानुसार ‘पृथ्वीचे तापमान १.१ अंश सेल्सिअसने वाढलेले असून ते १.५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तापमानात जर १.५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली, तर महाभयानक अन्नटंचाई, महागाई, बेरोजगारी, उपजीविकेच्या संधी गमावणे, आरोग्याच्या समस्या आणि स्थलांतर या घटकांना तोंड द्यावे लागेल. पूर्व आफ्रिकेत दुष्काळामुळे १ कोटी ७ लाख लोकांना अन्नाचा तुटवडा भासत आहे, इतकी भयानक परिस्थिती आताच निर्माण झाली आहे. त्यामुळे यापुढील काळात काय होऊ शकेल ?’ याचा विचारच न केलेला बरा !
वैज्ञानिक प्रगती मानवाच्या मुळावर !
वर्ष १८०० पासून जसजशी वैज्ञानिक प्रगती होत गेली, तसतशी समाजाची एकूणच निसर्गाप्रती असलेली संवेदनशीलता अल्प होत गेली. व्यापारीकरण, औद्योगिकरण याच्या हव्यासातून जागतिक स्तरावर बेसुमार वृक्षतोड, प्रसंगी डोंगर फोडून-कापून घरे बांधणे यांसह निसर्गावर अतिक्रमण करण्याची एकही संधी मानवाने सोडली नाही. जागतिक पातळीवर सर्व प्रकारचा अनिर्बंध वापर, विमानांची वाढती संख्या, अणूऊर्जा-औष्णिक प्रकल्पांमधून होणारे उत्सर्जन हे सर्व आता मानवाच्या मुळावर उठलेले आहे. ‘सहस्रो वर्षे प्रदूषणमुक्त असलेली पृथ्वी विज्ञानाने केवळ १०० वर्षांत प्रदूषणग्रस्त करून प्राणीमात्रांचा विनाश जवळ आणला आहे’, अशी सद्यःस्थिती आहे.
खरे पहाता या पर्यावरणाच्या हानीसाठी सर्वाधिक कोण उत्तरदायी असेल ? तर ती पाश्चिमात्य राष्ट्रेच आहेत. बेसुमार गाड्यांचा वापर, वातानुकूलन यंत्राचा (‘एसी’चा) वापर, काचेच्या इमारती, सिमेंटच्या इमारतींची जंगले, प्लास्टिक आणि विमान यांचा अतीवापर, प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा, अशा अनेकविध समस्या पाश्चात्त्य जगताने निर्माण केल्या आहेत. स्वत: काही न करता, स्वत:च्या नागरिकांवर बंधने न आणता हीच पाश्चात्त्य राष्ट्रे भारतासारख्या विकसनशील देशांकडे बोट दाखवून स्वत: नामानिराळे रहाण्याचा प्रयत्न करतात.
धर्मपालन हेच शाश्वत उत्तर !
थोडक्यात सांगायचे झाले, तर वायू प्रदूषणासहित सर्व प्रकारच्या प्रदूषणासाठी विज्ञानाच्या अतीवापरासह मनुष्याचे धर्माचरणापासून दूर जाणे, हेच कारण आहे. भ्रष्टाचार असो किंवा सुविधा भोगी प्रवृत्ती, हे धर्मापासून दूर जाण्याचेच परिणाम आहेत आणि म्हणून भौतिक वा मानसिक प्रदूषण या सर्वांचे उत्तर धर्मामध्येच आहे. हिंदु धर्म हा निसर्ग अनुकूल आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांनी सांगितलेलेच आहे. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, तसेच हिंदूंचा कोणताही ग्रंथ, दासबोध, ज्ञानेश्वरी यांसह प्रत्येक संतांच्या भजनांमध्ये निसर्गाचे महत्त्व सांगितलेलेच आहे. हिंदु संस्कृतीत वटपौर्णिमा, तुळशी विवाह यांसह अनेक सणांच्या माध्यमातून आपोआपच वृक्षांचे संवर्धन केले जाते. त्यामुळे हिंदूंनी निसर्ग आणि पर्यावरण यांच्या रक्षणासाठी वेगळे काही करायला हवे असे नाही. त्यामुळे जगाच्या दृष्टीने विचार केल्यास यापुढील काळात जर जागतिक स्तरावर पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल, तर हिंदु धर्मातील तत्त्वांचे आचरण करण्याकडेच आपल्याला वळावे लागेल !
जागतिक हवामान पालट आणि त्यातून निर्माण होणार्या समस्यांवर शाश्वत उपाय म्हणजे हिंदु धर्म-संस्कृती यांचे पालन होय ! |