पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार ! –  खासदार संजय राऊत, शिवसेना

खासदार संजय राऊत

मुंबई – उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली राज्‍याचा कारभार चालत आहे. कारागृहातील समस्‍यांविषयी मी त्‍यांची भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन माझ्‍यासमवेत काय झाले, हे त्‍यांना सांगीन, असे वक्‍तव्‍य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधींशी बोलतांना केले. कारागृहातून सुटका झाल्‍यावर १० नोव्‍हेंबर या दिवशी प्रथमच राऊत यांनी प्रसिद्धीमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधींशी संवाद साधला.

राऊत पुढे म्‍हणाले, ‘‘अंमलबजावणी संचालनालयावर मी टीपणी करणार नाही. ज्‍यांनी माझ्‍याविरोधात षड्‍यंत्र रचले, त्‍यांना यातून आनंद मिळाला असेल, तर मीही समाधानी आहे. माझा पक्ष आणि माझे कुटुंबीय यांनी बरेच काही गमावले आहे. ही राजकीय स्‍थिती देशाच्‍या इतिहासाने पाहिलेली नाही. पारतंत्र्यातही अशा प्रकारचे राजकारण नव्‍हते. कोणत्‍याही केंद्रीय यंत्रणेला मी दोष देणार नाही. महाराष्‍ट्रात स्‍थापन झालेल्‍या नवीन सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत. विरोधासाठी विरोध मी करणार नाही. राज्‍य आणि देश यांसाठी चांगल्‍या निर्णयाचे स्‍वागत केले पाहिजे. चुकीचे आरोप करून कुणालाही कारागृहात पाठवणे, हे चुकीचे आहे. मला जामीन संमत करतांना न्‍यायालयाने नोंदवलेल्‍या निरीक्षणामुळे देशाच्‍या न्‍यायव्‍यवस्‍थेवरील विश्‍वास वाढत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही चांगले निर्णय घेतले आहेत. मी कारागृहात असतांना त्‍यांनी ‘राजकारणातील कटुता संपली पाहिजे’, असे वक्‍तव्‍य केले. त्‍यांच्‍या या वक्‍तव्‍याचे मी स्‍वागत करतो.’’