दहिवडी (जिल्हा सातारा) कृषी कार्यालय शेतकर्‍यांसाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ !

सातारा, १० नोव्हेंबर (वार्ता.) – माण तालुक्यातील गोंदवले रस्त्यावर दहिवडी येथे कृषी कार्यालय आहे. कृषी कार्यालयाचा लोखंडी फलक गत अनेक वर्षांपासून आहे; मात्र त्यावरील अक्षरे पुसली गेली आहेत. याकडे दहिवडी कृषी कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जात आहे, तसेच ‘माणमधील शेतकर्‍यांनी कृषी कार्यालय शोधायचे कुठे ?’, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला असून कृषी कार्यालय म्हणजे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’, असा प्रकार होत आहे.

१. दहिवडी कृषी कार्यालयात रोपवाटिका आणि शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणारे केंद्र सुस्थितीत नाही. येथील कृषी अधिकारी आणि कार्यालयातील कर्मचारी वेळेत उपस्थित नसतात.

. कार्यालय परिसरात शौचालय नाही. कार्यालयात काम घेऊन येणार्‍यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.

३. कार्यालय परिसरात गवताचे मोठे साम्राज्य पसरले आहे.

४. शेतकर्‍यांना कृषीविषयी माहिती वेळेवर सांगण्यासाठी कर्मचारी उपस्थित नसतात. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना वाट पाहून माघारी जावे लागते. कार्यालयातील शिपाईसुद्धा वेळेवर कार्यालय उघडण्यासाठी येत नाही.

५. विविध कामांसाठी कार्यालयातील अधिकार्‍यांनी दलालांची नेमणूक केल्यामुळे नाईलाजास्तव दलालांकडून स्वत:ची कामे करून घ्यावी लागतात, असे अनुभव काही शेतकरी सांगतात.

६. दहिवडी कृषी कार्यालय दहिवडी गावठाणापासून २-३ किलोमीटर अंतरावर असल्यामुळे शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कार्यालयात येणे अडचणीचे ठरत आहे.

७. आता कृषी योजनांची माहिती ऑनलाईन उपलब्ध झाली असून याविषयी कृषी कार्यालयाकडून शेतकर्‍यांना कोणतीही माहिती दिली जात नाही.

८. सातारा जिल्हा प्रशासनाचेही याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले असून जिल्हा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे. (एवढ्या असुविधा आणि असंवेदनशील कर्मचारी असलेले कृषी कार्यालय कधी शेतकर्‍यांना साहाय्यभूत ठरू शकेल का ? संबंधित अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन कधी प्रयत्न करणार ? – संपादक)