युक्रेनने रशियाची आणखी एक युद्धनौका बुडवली !

अल् कायदासारख्या आतंकवादी संघटनांकडून वापरल्या जाणार्‍या पाण्याखालील ड्रोनचा युक्रेनकडून वापर !

युद्धनौका ‘मकरोव’

कीव (युक्रेन) – काळ्या समुद्रातील सेवास्तोपोल या रशियाच्या नौदलाच्या तळावर युक्रेनने ड्रोनच्या साहाय्याने केलेल्या आक्रमणात रशियाची एक युद्धनौका बुडाली. पाण्यातून वार करणार्‍या ड्रोनद्वारे अशा प्रकारची रशियाची दुसरी युद्धनौका बुडवण्यात आली.

यापूर्वी शक्तीशाली युद्धनौका ‘मोस्कवा’ बुडवण्यात आली होती. तिची जागा घेण्यासाठी आलेली ‘मकरोव’ हिला आता बुडवण्यात आले आहे. विशेष म्हणजे यासाठी वापरण्यात आलेला हा पाण्याखालील ड्रोन अल् कायदा आणि अन्य जिहादी आतंकवादी संघटनांकडून वापरला जातो. हा आत्मघाती ड्रोन ‘स्पीड बोट’च्या आकाराचा होता आणि त्यात शेकडो किलोग्रॅम स्फोटके होती. या ड्रोनला रोखण्यासाठी रशियाने हेलिकॉप्टरमधून गोळीबार केला; मात्र तो यशस्वी झाला नाही. या तळावर रशियाच्या ३० ते ४० युद्धनौका तैनात आहेत. या आक्रमणामुळे रशियावर एकतर सर्व युद्धनौका परत बोलवाव्या लागण्याची किंवा त्यांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर सामुग्री तैनात करण्याची वेळ आली आहे.