जिहादी आतंकवादाच्या विरोधात रणनीती सिद्ध करणारी संयुक्त राष्ट्रांची बैठक भारतात होणार !

नवी देहली – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ‘आतंकवाद प्रतिबंधक समिती’ची महत्त्वाची बैठक २८ आणि २९ ऑक्टोबर या दिवशी भारतात होत आहे. २८ ऑक्टोबरला मुंबईत, तर २९ ऑक्टोबरला देहलीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही समिती इंटरनेट, ‘डार्क-वेब’ आणि तंत्रज्ञानाच्या आतंकवादी वापराच्या विरोधात रणनीती सिद्ध करणार आहे. ‘डार्क-वेब’ म्हणजे इंटरनेटचा असा भाग जो केवळ विशिष्ट संगणकीय प्रणालींच्या माध्यमातूनच वापरता येऊ शकतो. ‘डार्क वेब’च्या माध्यमातून आतंकवादी कारवायांना चिथावणी देण्यात पाकचे नाव अनेक घटनांत समोर आले आहे. भारत यजमान देश असल्यामुळे त्याच्या बाजूने एखादा प्रस्ताव पारित करण्यात यशस्वी होऊ शकतो. भारताने त्यासाठी कूटनीती स्तरावर सिद्धताही केली आहे.

१. या समितीमध्ये भारतासमवेत अल्बानिया, ब्राझिल, गेबॉन, घाना, आयर्लंड, केनिया, मेक्सिको, नॉर्वे आणि संयुक्त अरब अमिरात या १० सदस्य देशांसमवेत संयुक्त राष्ट्रांचे ५ स्थायी सदस्य अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स अन् ब्रिटनही समाविष्ट आहेत.

२. सुरक्षा परिषदेच्या समितीची ७ वर्षांनंतर प्रथमच न्यूयॉर्क मुख्यालयाबाहेर बैठक होत आहे. या आधी अशा प्रकारची बैठक मुख्यालयाबाहेर म्हणजेच स्पेनच्या माद्रिदमध्ये वर्ष २०१५ मध्ये झाली होती.

३. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार नवी देहलीतील बैठकीचा उद्देश ‘संवाद आणि आर्थिक स्तरावरील अत्याधुनिक तंत्रज्ञान अन् त्याचा आतंकवादी करत असलेला अपवापर रोखणे’, असा आहे.