खरी दीपावली !

परात्पर गुरु पांडे महाराज

हृदयात आत्मप्रकाशाची ज्योत प्रज्वलित होऊन चोहीकडे आनंदमय वातावरण निर्माण होईल !

यशस्वीतेनंतरची दीपावली मनाला खरी शांती देते. अशा शांतीची अपेक्षा आपण या दीपावालीनिमित्त करून एका पणतीने दुसरी पणती पेटवत जगातील मानवाच्या हृदयातील आत्मज्योत पेटवूया. अशा लक्षावधी नव्हे, तर सकल प्राणीमात्रांच्या आत्मज्योतीने प्रकाशित होणार्‍या प्रकाशात शांतीचा आनंद घेऊया. प्रत्येकात आत्मप्रकाशाची ज्योत प्रज्वलित व्हायला पाहिजे. अशा स्वच्छ, शुद्ध आणि आनंदमय असलेल्या प्रकाशाची आभा सर्वत्र चोहीकडे आनंदमय वातावरण निर्माण करील अन् ‘आनंदीआनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे’, असे होईल. एवढेच नव्हे, तर संत ज्ञानदेवांच्या म्हणण्याप्रमाणे ‘विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’, असा सूर्य तेजाने प्रकाशणारा आनंदमय, तेवढाच पूर्ण, चंद्रमाप्रमाणे शीतल, शांत प्रकाश सर्वत्र पसरेल. सर्व प्राणीमात्रांना शांतीमय जीवनाचा लाभ मिळेल. अशा दीपावलीद्वारे सर्वांचे जीवन सुखी होईल. तेव्हाच खरी दीपावली साजरी केल्याचे श्रेय मिळेल.

हे प्रभो, या दीपावलीनिमित्त संत ज्ञानेश्वरांचे स्वप्न साकार होण्यासाठी आम्हाला उद्युक्त कर आणि त्यात आम्हाला सहभाग मिळू दे. यातील एका पणतीचे भाग्य आमच्या वाट्याला येऊ दे !

– परात्पर गुरु पांडे महाराज