(म्हणे) ‘मंदिरे आणि त्यांतील संपत्ती यांचा समाजाच्या प्रगतीसाठी म्हणावा तसा वापर होत नाही !’

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांचे विधान !

डॉ. सुरेश हावरे

नागपूर – देशभरात ३० लाख मंदिरे आहेत. लहानमोठी अशी मिळून ती जवळजवळ १ कोटी होतील. त्यांना प्रतिदिन येणारी देणगी कोटींच्या घरात आहे; पण एकसूत्रपणा, योग्य व्यवस्थापनाचा अभाव यांमुळे मंदिरे आणि त्यांतील संपत्ती यांचा समाजाच्या प्रगतीसाठी म्हणावा तसा वापर होत नाही. यासाठी विद्यापिठांनी ‘टेंपल मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम स्वीकारावा. त्यातून घडणारी नवी पिढी या कार्यात उतरली, तर हीच ३० लाख मंदिरे देशात क्रांतीकारी पालट घडवू शकतील, असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे माजी अध्यक्ष आणि अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे यांनी एका मुलाखतीत केले. त्यांनी ‘टेंपल मॅनेजमेंट’ या विषयावर पुस्तकही लिहिले आहे.

ते पुढे म्हणाले…

१. हा अभ्यासक्रम देशातील विद्यापिठांनी स्वीकारावा, यासाठी नागपूर, अमरावती, पुणे आणि विद्यालंकार विद्यापीठ, मुंबई येथील कुलगुरूंशी चर्चा केली आहे.

२. ‘एम्.बी.ए. इन टेंपल मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम चालू झाल्यास या क्षेत्रात सुजाण पिढी निर्माण होईल. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासह मंदिरांच्या संपत्तीचा समाजासाठी योग्य वापर होईल आणि देशात क्रांतीकारी पालट घडेल.

३. मंदिरांचा चेहरा सेवाभिमुख आणि समाजाभिमुख व्हावा. (मंदिरांचा चेहरा हा धर्माभिमुख व्हावा, असे हिंदूंना वाटते. – संपादक) सामाजिक उपक्रम सर्व मंदिरांमधून चालवण्यासाठी उत्तम व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. ती अभ्यासक्रमातून पूर्ण होऊ शकते. (सामाजिक उपक्रम चालवण्यासाठी सामाजिक किंवा सेवाभावी संघटना असतात; पण धर्माचे रक्षण कुणीही करत नाही. मंदिरांचा अभ्यासक्रम धर्माधिष्ठित असायला हवा ! – संपादक)

४. मंदिरांचा योग्य तो वापर झाला, तर ‘दानपेटी हवी कशाला ?’, असे विचारणार्‍यांना उत्तर मिळेल. (मंदिरातील दानपेटीचा वापर धार्मिक कार्य, तसेच धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांसाठीच व्हायला हवा ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

  • मंदिरे ही हिंदु धर्माशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांचा समाजाच्या प्रगतीपेक्षा धर्मकार्यासाठी वापर होणे हे उचित ठरेल !
  • आज धर्माला उतरती कळा लागली आहे. धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. असे असतांना धर्मरक्षणासाठी मंदिरे आणि त्यांची संपत्ती यांचा विनियोग करणे हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे. त्यामुळे सुरेश हावरे यांनी समाजापेक्षा धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी मंदिरांचा कसा वापर होईल, या दृष्टीने अभ्यासक्रमातून प्रयत्न करावेत, असे धर्मप्रेमी हिंदूंनी वाटते !
  • ‘कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून जनतेला लुटणार्‍या बहुतांश राजकारण्यांकडून तो पैसा वसुल करून त्याचा वापर समाजाच्या विकासासाठी करावा’, असा विचार हावरे का मांडत नाहीत ?