‘हिंदु जनजागृती समिती’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त जुन्नर (जिल्हा पुणे) येथील शिवनेरी गडाची सामूहिक स्वच्छता !

‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ यशस्वी होण्यासाठी शिवाईदेवीच्या चरणी श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण

‘हिंदु जनजागृती समिती’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त जुन्नर (जिल्हा पुणे) येथील शिवनेरी गडाची सामूहिक स्वच्छता

जुन्नर (जिल्हा पुणे), १९ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने, पुरातत्व विभाग यांच्या लेखी अनुमतीने येथील शिवनेरी या ऐतिहासिक गडाची आणि शिवाईदेवी मंदिराची १६ ऑक्टोबर या दिवशी सामूहिक स्वच्छता करण्यात आली. या वेळी समितीचे पुष्कळ कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी जमलेले हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी कार्यकर्ते, तसेच रणरागिणी यांनी सामूहिकरित्या हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली. या प्रसंगी शिवाईदेवीच्या मंदिरात देवीच्या चरणी श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ यशस्वी होण्यासाठी देवीला प्रार्थना करून आशीर्वाद घेण्यात आले. या अभियानात मोईगाव आणि फलकेवस्ती या नवीन धर्मशिक्षणवर्गांमधील धर्मप्रेमी आणि रणरागिणी सहभागी झाल्या होत्या.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश जोशी यांनी सध्या देशभरात हलाल उत्पादनांच्या माध्यमातून होत असणारी हिंदूंची लूट आणि देशविघातक कृती यांविषयी सर्व धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. ‘यंदाची दिवाळी ही ‘हलालमुक्त’ व्हायला हवी, म्हणजे हलाल प्रमाणित कुठलेच उत्पादन घेणार नाही किंवा खाणार नाही’, असा संकल्प या वेळी धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांनी केला.

वैशिष्ट्यपूर्ण

१. या उपक्रमासाठी मोई गावातून श्री. गोरख गवारे, सौ. प्रियांका गवारे आणि फलके वस्तीवरून सौ. रूपाली फलके अन् सौ. विद्या कुटे यांनी पुढाकार घेऊन नियोजन केले होते.

२. सातारा येथून आलेले ७५ वर्षांचे श्री. विजय देशपांडे आणि त्यांचे १६ सहकारी यांनी कार्याचे कौतुक केले अन् ते काही वेळासाठी सहभागीसुद्धा झाले, तसेच संभाजीनगर येथून आलेल्या काही युवकांनी शिवनेरी गड स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. त्यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. तसेच ‘असे कार्य प्रत्येक संघटनेने स्वत:चे कार्यकर्ते घडवण्यासाठी, सेवाभावी वृत्ती वाढवण्यासाठी करणे आवश्यक आहे, नुसता दिखाऊपणा नको, तर प्रत्यक्ष कृती हवी’, असे त्यांनी सांगितले.

३. सर्व धर्मप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. सर्वजण अधूनमधून जोशपूर्ण घोषणा देऊन एकमेकांचा उत्साह वाढवत होते.