आश्विन पौर्णिमा, म्हणजे कोजागिरी पौर्णिमा (९.१०.२०२२) या दिवशी श्री. बाळासाहेब विभूते यांचा ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचा मोठा मुलगा श्री. अभिजित विभूते यांना त्यांच्या साधनाप्रवासाच्या संदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.
१. लहानपणापासून आई-वडिलांकडून साधनेचे संस्कार होणे
‘माझे वडील श्री. बाळासाहेब विभूते यांना लहानपणापासूनच साधनेची ओढ होती. ‘त्यांच्यावर त्यांची आई (कै. पार्वती गुरुलींगअप्पा विभूते) आणि वडील (कै. गुरुलींगअप्पा विभूते, कुर्ली, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव), त्यांचे गुरुजी आणि श्री हालसिद्धनाथ यांची कृपादृष्टी आहे’, असा त्यांचा भाव आहे. आमची आजी आणि आजोबा (माझ्या वडिलांचे आई-वडील) यांनी माझ्या वडिलांना साधनेच्या प्रवाहात आणले. माझे आजोबा गावामध्ये समाजातील लोकांना धार्मिक ग्रंथांचे वाचन करून धर्मशिक्षण देत असत. त्यांच्या व्यवसायामध्ये ते प्रामाणिक होते. त्यांची साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी होती. त्यांचा पोशाखही सात्त्विक होता. माझी आजी आधीपासून समाजसेवा आणि धर्माचरण करत होती. ती ‘मुलांवर संस्कार कसे करावेत ?’, याचा जणूकाही चालता-बोलता ग्रंथच होती. माझे बाबा (श्री. बाळासाहेब विभूते) लहानपणी अंधाराला घाबरत होते. तेव्हा ‘तू रामनाम घेत चाल’, असा त्यांच्यावर संस्कार केल्यामुळे ते पुढे कधीही अंधाराला घाबरले नाहीत.
२. प्रामाणिकपणा
नोकरीतील सर्व कामे प्रामाणिकपणे आणि परिपूर्ण करत होते.
३. देवाप्रती भाव
अ. ‘शालेय परीक्षाही देवाच्या कृपेनेच झाली’, असा वडिलांचा भाव असे.
आ. त्यांनी त्यांच्या सरकारी नोकरीतील (२१.१.१९७६ या दिवशी) पहिला पगार देवाला अर्पण केला होता.
इ. श्री हालसिद्धनाथांच्या यात्रेच्या वेळी यात्रेतील ढोल आणि बासरी यांचे वादन चालू असतांना यात्रेतील सर्व दृश्य पाहून वडिलांचा भाव जागृत होत असे. लहानपणापासून त्यांच्यात देवाची पुष्कळ ओढ होती.
ई. ‘देवाच्या कृपेमुळे सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याची संधी मिळाली’, असा त्यांचा भाव आहे.
४. सेवाभाव
बाबांनी लहानपणापासून हालसिद्धनाथांची सायंकाळची आरती कधीही चुकवली नाही. त्या आरतीत नगारा वाजवणे, मंदिर स्वच्छता करणे, अशा सेवा ते नेहमी करत.
५. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केल्यावर
५ अ. कुटुंबियांच्या साधनेची तळमळ असणे : वर्ष १९९६ मध्ये सांगली येथील गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला वडिलांनी आमच्या संपूर्ण कुटुंबाला नेले होते. ‘संपूर्ण कुटुंबाने साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्यांमधून मुक्त व्हावे’, अशी त्यांची पुष्कळ तळमळ असते.
५ आ. प्रेमभाव : माझ्या आईला (सौ. अंजली बाळासाहेब विभूते, वय ५९ वर्षे) शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास तीव्रतेने होत असतांनाही बाबा तिला समजून घेत. ते आम्हालाही सांगतात, ‘‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांची कशी काळजी घेतात ?, तशीच आपणही काळजी घेतली पाहिजे.’’
५ इ. गुरुसेवेची तळमळ
१. वर्ष २००६ मध्ये वडिलांनी माझ्या बहिणीच्या (सौ. रोहिणी चंद्रशेखर राजमाने) लग्नपत्रिकेत ‘सनातन संस्थेला अर्पण ’ हाच आमचा अहेर’, असा मजकूर लिहिला होता. हा मजकूर केवळ लिहिला नाही, तर त्यांनी आलेला अहेर अर्पण केला.
२. बहिणीच्या लग्नामध्ये सनातन संस्थानिर्मित सात्त्विक गणेशमूर्ती ठेवली होती. सनातन संस्थेचा फलक (बॅनर) लावून ग्रंथप्रदर्शन कक्ष मांडला होता. अशा प्रकारे लग्नाचे वातावरण सनातनमय झाले होते. ‘सनातनच्या कार्याचा प्रचार व्हावा’, अशी त्यांची तळमळ होती.
५ ई. सात्त्विकतेची आवड : वडिलांनी आमच्या घरी नवीन ‘टेपरेकॉर्डर’ आणला होता. त्यांनी त्याच्या समवेत प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांच्या ध्वनीफितींचा संच आणला. त्यांनी आम्हाला ‘टेपरेकॉर्डर’वर चित्रपटगीते कधीच ऐकू दिली नाहीत. आमच्या घरी नेहमी प.पू. भक्तराज महाराज यांच्या आवाजातील भजने चालू असायची.
५ उ. आईच्या निधनानंतर स्थिर राहून नातेवाइकांना साधना सांगणे
१. माझ्या आजीच्या निधनानंतर (८.१.२०११) बाबांनी स्थिर राहून अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना साधना समजावून सांगितली.
२. अंत्यसंस्काराला आलेल्या मंडळींकडून त्यांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा सामूहिक नामजप करून घेतला आणि आजीला पुढील गती मिळण्यासाठी सर्वांकडून प्रार्थना करून घेतल्या.
३. घरात प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावली.
४. सर्व अंत्यविधी पूर्ण झाल्यावर ‘प्रसन्न वातावरणात विधी पूर्ण झाला’, असे सर्व नातेवाईक आणि समाजातील लोक यांनी सांगितले. ‘आजपर्यंत सात्त्विक पद्धतीने झालेला अंत्यविधी पाहिला नाही’, असे मत त्यांनी व्यक्त केले.
५ ऊ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : वडिलांना तंबाखू खाण्याची सवय होती; परंतु सनातनमध्ये आल्यावर ती सवय त्यांनी एका दिवसात बंद केली. ‘गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) आवडणार नाही’, असा विचार करून त्यांनी लागलेली व्यसने लगेच सोडली. ‘ती देवाने सोडवली’, असे त्यांना वाटते.
५ ए. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा :
एकदा वडिलांच्या पायावर एक इसब होऊन जखम झाली होती. (त्वचेला येणार्या ओल्या आणि कोरड्या सुजेला ‘इसब’ असे म्हणतात.) त्यावर पुष्कळ औषधोपचार केले; परंतु ती बरी होत नव्हती. त्यांना त्यांच्या मित्राने टोमणे मारले. ‘तू सनातनचे एवढे करतोस, तरी तुला अजूनही कसे बरे वाटत नाही ?’, असे मित्राने म्हटल्यावरही त्यांना त्याच्याविषयी कधीही राग आला नाही. त्यानंतर एका मासाच्या आतच त्यांची ती जखम पूर्ण बरी झाली. समाजातील लोकांनाही ‘काही औषधोपचारांविना देवावरील श्रद्धेमुळे असे चमत्कार घडतात’, हे लक्षात आले. वडिलांनी गुरूंवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) दृढ श्रद्धा ठेवल्यामुळे देवाने ही अनुभूती दिली.
‘साधना आणि प्रपंच यांचा मेळ घालून आध्यात्मिक उन्नती कशी करून घ्यावी ?’, याचे माझ्यापुढे आदर्श उदाहरण, म्हणजे माझे वडील ! आम्हा भावडांवर संस्कार करतांना ते स्वतः कृती करून मग आम्हाला सांगायचे; म्हणून त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये चैतन्य असते. त्यांनी आमच्यावर सनातनच्या मार्गदर्शनानुसार संस्कार कोरल्यामुळेच मला (श्री. अभिजित बाळासाहेब विभूते) आणि माझ्या भावाला (श्री. उमाकांत बाळासाहेब विभूते) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. ‘गुरुकृपायोगानुसार साधना केल्यामुळे ते आज गुरुचरणांशी एकरूप होत आहेत’, असे मला जाणवते.’
– श्री. अभिजीत विभूते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.९.२०२२)