खासगी ट्रॅव्हल्समालकांकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी वर्धा येथे परिवहन अधिकार्‍यांना निवेदन !

वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीचा सुराज्य अभियान उपक्रम

परिवहन निरीक्षक मेघल अनासने (उजवीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

वर्धा, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – सण, उत्सव आणि शालेय सुटी या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्समालकांकडून तिकिटांचे अधिक दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. याला प्रतिबंध घालण्यासंदर्भात परिवहन विभागाने राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना आदेश दिले आहेत. या संदर्भात त्वरित कार्यवाही करावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सुराज्य अभियानाच्या अंतर्गत स्थानिक उपप्रादेशिक परिवहन निरीक्षक मेघल अनासने यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र देशपांडे, डॉ. पंडित थोटे, सौ. भक्ती चौधरी आदी उपस्थित होत्या.

प्रवाशांची आर्थिक लूट थांबवण्याच्या संदर्भात करावयाच्या कार्यवाहीविषयीचे निर्देश परिवहन आयुक्तांनी २५ ऑगस्ट २०२२ या दिवशी सर्व प्रादेशिक परिवहन आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना निर्गमित केले आहेत. या आदेशात ‘खासगी ट्रॅव्हल बस सुटतात, त्या ठिकाणी तिकिटाचे दरपत्रक लावण्यात यावे’, असे निर्देश देण्यात आले आहे. या निर्देशांचे पालन होते कि नाही, हेही पहाण्यास सांगितले आहे. ‘वर्धा जिल्ह्यात याची त्वरित कार्यवाही करण्यात यावी’, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.