भारतातील गरीबी आणि उपासमारी यांच्याशी लढण्यासाठी होणार वापर !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांच्या १४ स्वयंसेवी संस्थांच्या ‘इंडिया फिलॅन्थ्रॉपी अलायन्स (आयपीए)’ (भारत समाजसेवी युती) या संयुक्त संघटनेने २ मार्च २०२३ या दिवशी ‘इंडिया गिव्हिंग डे’ (भारताला देण्याचा दिवस) साजरा करण्याची घोषणा केली आहे. या दिवशी भारतात मानवीय आणि विकास उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी आर्थिक साहाय्य एकत्रित केले जाईल. ‘आयपीए’ प्रतिवर्षी १ अब्ज डॉलर म्हणजे ८ सहस्र २१९ कोटी रुपये जमवते; पण पुढील वर्षी ३ अब्ज डॉलर, म्हणजे २४ सहस्र ६५७ कोटी रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही रक्कम भारतात गरिबी आणि उपासमारी यांच्याशी लढण्यासाठी, तसेच विविध कामांसाठी दिली जाईल.
‘इंडिया फिलॅन्थ्रॉपी अलायन्स’चे अध्यक्ष दीपक राज म्हणाले की, भारताने स्वातंत्र्य मिळवल्यापासून केवळ ७५ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. अजून बरेच काही साध्य करायचे आहे. त्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून रहाणे योग्य ठरणार नाही. आमच्यापैकी प्रत्येक भारतीय आपल्या उत्पन्नाचा काही भाग देण्यास सिद्ध असेल, तर भारत निश्चितपणे पुष्कळ गतीने प्रगती करील.
आयपीएत सहभागी असलेल्या सेजल देसाई म्हणतात की, भारतीय वंशाचे लोक अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत आले आहेत. त्यामुळे आता स्वदेशासाठीही विचार करणे आवश्यक आहे. अमेरिकेतील भारतियांनी यापूर्वीही वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक साहाय्य केलेले आहे; परंतु या वेळी मोठा निधी जमवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
कोट्यवधी गरजू भारतियांना तुमची आवश्यकता आहे, असा विचार करा ! – आयपीएचे संचालक अॅलेक्स काउंट्ससंयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, भारतातील अनुमाने १०३ कोटी लोकांना अजूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य देखभाल, स्वच्छ पाण्यासह अनेक मूलभूत गोष्टींची आवश्यकता आहे. भारताशी संबंध असलेल्या सर्वांनीच ‘इंडिया गिव्हिंग डे’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयपीएचे संचालक अॅलेक्स काउंट्स यांनी केले आहे. त्यांनी अमेरिकेत रहात असलेल्या भारतीय वंशाच्या लोकांना आवाहन करत म्हटले आहे की, २ मार्च २०२३ पर्यंत आपल्या समुदायाच्या कोट्यवधी गरजू लोकांना तुमची आवश्यकता आहे, असा विचार करा ! ईच्छुक लोक www.indiagivingday.org या संकेतस्थळावर जाऊन ‘इंडिया गिव्हिंग डे’चा भाग बनण्यासाठी अर्ज करू शकतात. संघटनेद्वारे गोळा केला जात असलेला निधी भारतात वेगवेगळ्या कल्याणकारी संघटनांना पाठवला जाईल. |
संपादकीय भूमिका
|