राष्ट्रासाठी निस्वार्थीपणे कार्य करण्याची प्रेरणा प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याकडून घ्यावी ! – प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी, पिठाधीश्वर, तपोभूमी, कुंडई

कर्मयोगी प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांचा अमृत महोत्सवी सोहळा !

स्वामी दुर्गानंदगिरी यांनी महर्षि व्यास यांची मूर्ती भेट देऊन प्रा. वेलिंगकर यांचा सन्मान केला तो क्षण

वेर्णा, (गोवा) ९ ऑक्टोबर (वार्ता.) – प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी गोव्यात हिंदूसंघटनाचे महत्कार्य केले आहे. प्रा. वेलिंगकर यांनी या कार्यात सर्वांना सहभागी करून घेतले आहे. तरुणांनी आज राष्ट्रासाठी निस्वार्थीपणे कार्य करण्याची प्रेरणा प्रा. वेलिंगकर यांच्याकडून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन तपोभूमी, कुंडई येथील पिठाधिश्वर पद्मश्री प.पू. ब्रह्मेशानंदस्वामी महाराज यांनी चलचित्राद्वारे (‘व्हिडिओ’च्या माध्यमातून) केले.

प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी
प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्यावरील ‘कर्मयोगी’ या ग्रंथाचे प्रकाशन करतांना मान्यवर

कर्मयोगी प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांचा अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने वेर्णा येथे श्री महालसा नारायणी देवीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांचा आशीर्वचनाचे चलचित्र प्रदर्शित करण्यात आले. या चलचित्रामध्ये प.पू. स्वामीजींनी हे आवाहन केले. या वेळी व्यासपिठावर प्रा. वेलिंगकर यांचे गुरु स्वामी दुर्गानंदगिरी, कार्यसन्मान सोहळा समितीचे पदाधिकारी प्रा. माधवराव कामत, उद्योजक अनिल खंवटे, श्री. रामदास सराफ, तसेच पू. मुंकुदबुवा मडगावकर, प्रा. दिलिप बेतकीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी स्वामी दुर्गानंदगिरी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रा. सुभाष वेलिंगकर यांना त्यांचे गुरु स्वामी दुर्गानंदगिरी यांच्या शुभहस्ते महर्षि व्यास यांची मूर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या जीवनावर आधारित ‘कर्मयोगी’ या गौरव ग्रंथाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रा. सुभाष वेलिंगकर यांना या वेळी मानपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले. मानपत्राचे वाचन श्रीमती कोमल कामत यांनी केले.

प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे मनोगत

राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सर्वांनी सहभाग घ्यावा !

प्रा. सुभाष वेलिंगकर

आज समाजाच्या होणार्‍या अध:पतनामुळे खंत वाटते. सज्जनशक्ती संपवण्याचे काम आज केले जात आहे. गोव्यात सज्जन लोक पुष्कळ आहेत; परंतु त्यांना राष्ट्ररक्षणाच्या सूत्रांविषयी देणेघेणे नसते, याविषयी मला खंत वाटते. समाज सतर्क नसेल, तर देशासमोर मोठी संकटे येतात. आज ऋषिमुनींप्रमाणे आम्हाला शक्ती निर्माण करावी लागेल. कुंकळ्ळी येथे १६ महानायकांचे स्मारक हे आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे एक प्रतीक आहे. गोव्याला आज वाचवायचे असेल, तर राष्ट्रवादी विचारसरणीच्या लोकांचा गट निर्माण केल्याविना पर्याय नाही. हा गट राजकारण्यांच्या ‘ताटाखालचे मांजर’ होऊ नये. तो कृतीशील असला पाहिजे. प्रत्येकाने दिवसातील कमीतकमी १० मिनिटे देशासाठी दिली, तरच देश विश्वगुरुपदी विराजमान होऊ शकेल. आज आपापसांतील हेवेदावे आणि कटुता बाजूला सारून सर्वांनी एकत्र आल्यासच राष्ट्रनिर्माणाचे कार्य होईल. राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. गोव्यात कधीही कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास त्याला तोंड देण्याची सिद्धता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे.

प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

मला माणूस म्हणून घडवणारे प्राचार्य माधव कामत यांचा मी अत्यंत ऋणी आहे. माझे धन हे माझे नसून यावर देवाचा अधिकार आहे, असे मानणे हा खरा निस्वार्थ, निस्पृह विचार होय ! तत्त्वांशी तडजोड न करता, श्रद्धेने तत्त्वनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मला सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी दिली. राजकीय मान्यता झुगारून देण्याचे बळ कार्यकर्त्यांनी दिले; म्हणूनच मी हे सर्व करू शकलो. हा माझा सत्कार नसून समाजाच्या ताकदीचा सत्कार आहे.

प्रा. वेलिंगकर यांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असे मानून आजपर्यंत जीवन जगले ! – प्रा. दिलीप बेतकीकर, प्रमुख वक्ता

प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी कार्यकर्त्यांना घडवण्यासाठी गोव्यात पेडणे ते काणकोणपर्यंत भ्रमण केले आहे. सर्वस्वाचा त्याग करून ते कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त असलेली माणसे उभी केली आहेत. प्रा. वेलिंगकर हे केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी ज्ञानार्जन करणारे शिक्षक नव्हते, तर समाजमन घडवणारे ते शिक्षक होते. गोव्यात रा. स्व. संघाच्या कार्याचे ते प्रेरणास्रोत होते. सामाजिक चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते संशोधक वृत्तीचे होते. तळागाळातील लोकांची मानसिकता जाणून घेऊन त्यांचा अभ्यास करून त्यांनी संघाच्या कार्यातून हिंदुत्व गावोगावी पोचवले. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ असे मानून ते आजपर्यंत  जगले.

कर्मयोगी प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला उपस्थित जनसमुदाय

क्षणचित्रे

१. मान्यवरांचे ढोलताशांच्या गजरात आगमन झाले.
२. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यसन्मान सोहळा समितीचे अध्यक्ष प्रा. माधव कामत, सूत्रसंचालन श्री. अजय वैद्य यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. नितीन फळदेसाई यांनी केले.
३. प्रा. वेलिंगकर यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले त्यांचे गुरु स्वामी दुर्गानंदगिरी आणि ह.भ.प. मुकुंदबुवा मडगावकर यांना चरणस्पर्श करून सत्कार स्वीकारला.
४. कार्यक्रमाला लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सभागृहाच्या बाहेरही पडदा लावून त्यावर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जात होते.
५. कार्यक्रम निर्धारित वेळेत चालू होऊन निर्धारित वेळेत संपला.

____________________________

हेही वाचा – गोमंतकातील हिंदुत्वाची धगधगती ज्वाळा प्रा. सुभाष वेलिंगकर !
https://sanatanprabhat.org/marathi/618641.html
____________________________________