१. कृतीच्या स्तरावर प्रयत्न न करता केवळ वाचन करून त्याविषयी भाष्य केल्यास विषयाच्या ज्ञानाने अहं वाढणे आणि याउलट संत कृती करून दाखवत असल्याने ते साधकांना अधिक प्रिय असणे
कृतीच्या स्तरावर प्रयत्न न करता केवळ वाचन करून त्याविषयी भाष्य केल्यास विषयाच्या ज्ञानाने अहं वाढू शकतो. त्यामुळे बरेच प्रवचनकार, कीर्तनकार आणि सत्संग घेणारे यांच्यामध्ये अध्यात्म कृतीत न आणल्याने ज्ञानाचा तीव्र अहं निर्माण होतो. ते आयुष्यभर लोकांना ज्ञान सांगतात; पण स्वतः त्याला अनुसरून कृती करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वाणीत चैतन्य नसते. याउलट संतांचे असते. संत अल्प बोलतात; परंतु ते इतरांना स्वतःच्या कृतीतून शिकवतात; म्हणून ते साधकांना एखाद्या प्रवचनकारांपेक्षाही प्रिय असतात.
२. काळानुसार ‘उत्तम कर्म’ हेच ‘उत्तम ध्यान’ असणे
‘काळानुसार ‘उत्तम कर्म’ करणे, हेच सध्याच्या घडीला ‘उत्तम ध्यान’ आहे. केवळ ध्यानाने प्रगती होत नाही; कारण ध्यान लागण्याएवढी सात्त्विकता आपल्यात नसते. ती उत्तम कर्म करून मिळवावी लागते. उत्तम आचरण, उत्तम विचार आणि देवाचे उत्तम अनुसंधान यांमुळे देह सात्त्विक होऊ लागतो. असा देहच ‘उत्तम ध्यान’ करू शकतो.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.४.२०२०)