‘जिला आम्ही कधी पाहिले नाही,जिने कधी आम्हाला शिकवले नाही. त्या सरस्वतीदेवीचे चित्र शाळेत कशाला पाहिजे ?’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी केले. खरेतर सावित्रीबाई फुले यांच्या ‘काव्यफुलें’ या कवितासंग्रहात श्री सरस्वतीदेवीचा उल्लेख आढळतो.
सावित्रीबाईंनी मुलींना ‘विद्यादेवी सरस्वतीला प्रसन्न करूया’, असे काव्याद्वारे सांगणे
‘काव्यफुलें’ पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शंकर पार्वतीचे चित्र आहे. त्याच्या आतील प्रारंभीची रचना पहा….
सावित्रीबाई लिहितात,
‘शिव तुझे जपे स्तोत्र । प्रेम भावे गातसे मी ।
विश्वंभरा तू महेशा । सद्भावे तुला वंदी ।’
सावित्रीबाई पुढे लिहितात, ‘ज्याच्यामुळे या जगाची निर्मिती झाली, जो त्रैलोकला(त्रैलोक्याला) आपल्या बळावर सांभाळू शकतो, त्या शंकराकडे मी वर मागते, माझ्या जिव्हेवर (जीभेवर) बसून तू माझ्याकडून काव्यरचना करवून घे !’
सावित्रीबाईंनी तरी कुठे पाहिला होता शंकर आणि कुठे पाहिली होती सरस्वती ! पुढे एके ठिकाणी सावित्रीबाई मुलींना उद्देशून म्हणतात,
‘सरस्वतीचा हा दरबार खुला जाहला पाहू चला ।
शाळेमधुनी शिकूनि घेऊ ज्ञान मिळवू चला ग चला ।।
सरस्वतीच्या दरबारात शिक्षण घेणे जाऊ चला ।
विद्यादेवीस प्रसन्न करूनि वर मागू तिजला चला ।
या काव्यामध्ये तर सावित्रीबाई ‘विद्यादेवी सरस्वतीला प्रसन्न करूया’, असे म्हणतात.
कुठे सावित्रीबाईंची काव्यफुले आणि कुठे भुजबळांची मुक्ताफळे !
बहुजन सत्यशोधक चळवळ, स्त्री शिक्षणात मूलगामी काम करणारे सावित्री-ज्योतिबा स्वतः जर सांगत असतील की, शाळा हा सरस्वतीचा दरबार आहे, तर तो नाकारणारे भुजबळ कोण ? एकीकडे विद्यादेवीला प्रसन्न करू म्हणणार्या सावित्रीबाई, तर दुसरीकडे सरस्वती आणि शारदा यांचे चित्र हटवा म्हणणारे छगन भुजबळ ! कुठे सावित्रीबाईंची काव्यफुले आणि कुठे या भुजबळांची मुक्ताफळे !’
– पार्थ बावस्कर
(साभार : फेसबुक)