वेंगुर्ला समुद्रातील ‘वेंगुर्ला रॉक्स’ बेटांवर आढळल्या ४ गुहा

वेंगुर्ला – येथील समुद्रात असलेल्या ‘वेंगुर्ला रॉक्स’ (वेंगुर्ला खडक द्वीपसमूह) बेटांचे सर्वेक्षण करत असतांना एका बेटावर ४ गुहांचा शोध लागला आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा या गुहांच्या अभ्यासामुळे त्यांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘कांदळवन कक्ष’ (कांदळवन म्हणजे खाडीच्या पाण्यातील चिखलात उगवणारे, भूमीची धूप रोखणार्‍या वृक्षांचा समूह) प्रयत्न करणार आहे.

मॅनग्रोव्ह ॲण्ड मरिन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने वेंगुर्ला येथील या ‘वेंगुर्ला रॉक्स’ या बेटांचा अभ्यास केला आहे. वेंगुर्ला येथील समुद्रात भारतीय पाकोळी पक्षांचा वावर असल्याने तिथे एक विशिष्ट प्रकारची परिसंस्था निर्माण झाली आहे. हे पक्षी येथील गुहेत रहातात. तसेच तेथे ओळख न पटलेल्या प्रजाती आहेत. त्यात कोळी, भुंगेरा, खेकडे, पतंग, फुलपाखरे, चतूर, रातकीडा, सिल्व्हर फिश आणि बरनॅकल्स आदी प्रजातींचा समावेश आहे. भारतीय पाकोळ्यांच्या घरट्यांसह ४ सहस्र ७०० अन्य पक्ष्यांची घरटी तेथे असल्याची नोंद करण्यात आली आहे.

‘वातावरण पालटल्यामुळे गुहेतील अपृष्ठवंशियांच्या विविधतेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो’, असे पाणथळ क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. वेंगुर्ला खडक द्वीपसमुहाच्या गुहेतील प्राणीसृष्टी समजून घेतांनाच त्यांचा अधिवास आणि त्यांना असलेला धोका यांवर अभ्यास केला आहे, अशी माहिती कांदळवन कक्षाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसरंक्षक वीरेंद्र तिवारी यांनी दिली.