अयोध्या येथील श्रीमती मिथिलेश कुमारी यांना वर्ष २०१९ मध्ये रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या विविध अनुभूती 

१. श्री दुर्गादेवीच्या मंत्रांचे पठण चालू असतांना श्री दुर्गामातेचे झालेले दर्शन

श्रीमती मिथिलेश कुमारी

‘मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्री दुर्गादेवीच्या मंत्रांचे पठण करत होते. तेव्हा मला श्री दुर्गामाता नाकात नथ घालून आणि हिरव्या रंगाची साडी नेसून एका बालिकेच्या रूपात उभी असलेली दिसली. मंत्रपठण पूर्ण होत असतांना मला मोत्यांचे पैंजण घातलेला तिचा एक चरण दिसला. तेव्हा माझा भाव जागृत होऊन मला आनंद झाला.

२. आश्रमात झालेल्या यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती 

२ अ. राजमातंगी यज्ञाच्या वेळी यज्ञस्थळी सुदर्शनचक्र फिरतांना दिसून ‘सर्व साधकांचे त्रास दूर होत आहेत’, असे वाटणे : जानेवारी २०१९ मध्ये महर्षींच्या आज्ञेनुसार आश्रमात अनेक यज्ञ करण्यात आले. १२.१.२०१९ या दिवशी राजमातंगी यज्ञाच्या वेळी ‘यज्ञस्थळाच्या वर एक मोठे सुदर्शनचक्र सतत फिरत आहे, तसेच मंत्र म्हणणार्‍या पुरोहितांच्या डोक्यावर लहान दोन चक्रे फिरत असून भूमीवरही चक्र फिरत आहे’, असे मला दिसत होते. तेव्हा ‘सर्व साधकांचे त्रास दूर होत आहेत’, असे मला वाटत होते. या यज्ञात कोणतेही अडथळे आले नाहीत.

२ आ. शेवटच्या यज्ञाच्या दिवशी

२ आ १. महामृत्युंजय मंत्रपठण करतांना ‘यज्ञस्थळी शिव आणि पार्वतीमाता कमळावर बसले आहेत’, असे जाणवणे : आज (१३.१.२०१९ या दिवशी) महर्षींनी करण्यास सांगितलेल्या यज्ञांतील शेवटचा यज्ञ होणार होता. सकाळी १०.३० वाजल्यापासून मी आश्रमात महामृत्युंजय मंत्रपठण करत होते. त्या वेळी ‘यज्ञस्थळी शिव आणि पार्वतीमाता फिकट गुलाबी रंगाच्या मोठ्या कमळावर बसले असून त्यांनी त्यांच्या दोन्ही हातांत कलश घेतले आहेत’, असे मला जाणवत होते. त्या वेळी मला सतत परात्पर गुरु डॉक्टर आणि शिव यांचे स्मरण होत होते अन् कृतज्ञता व्यक्त होत होती.’

– श्रीमती मिथिलेश कुमारी, अयोध्या (१३.१.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक