स्वप्नात देवीने कुमारिकेच्या रूपात दर्शन देऊन प्रत्यक्षात बालसाधिकेच्या माध्यमातून त्याची प्रचीती देणे

१. स्वप्नामध्ये तेजस्वी कुमारिका दिसून ती देवी असल्याचे जाणवणे

श्री. अतुल पवार

‘१४.१०.२०२१ या दिवशी (आश्विन शुक्ल नवमीला) सकाळी ६ वाजता मला एक स्वप्न पडले. स्वप्नामध्ये एक सुंदर आणि तेजस्वी कुमारिका दिसली. तिने माझ्याकडे पाहून प्रसन्न मुद्रेने स्मित केले. तिचे स्मितहास्य लोभस आणि आशीर्वादात्मक होते. तिला पाहून ‘ही एक देवीच असावी’, असे मला वाटले. तिच्या रूपाचे दर्शन झाल्यावर मला लगेच जाग आली. जाग आल्यानंतरही मला पुष्कळ प्रसन्न वाटत होते.

२. स्वप्नात दिसलेल्या कुमारिकेविषयी विचार करत असतांना आश्रमातील बालसाधिकेने त्या दिवशी कुमारिकापूजन असल्याचे सांगणे

झोपेतून उठल्यानंतर माझी अंघोळ होईपर्यंत ‘ती कुमारिका कोण होती ? आज ती मला स्वप्नात दिसण्याचे कारण काय आहे ?’, असा एकच विचार करत मी आवरले. त्यानंतर मी अल्पाहार  करायला रामनाथी आश्रमातील भोजनकक्षात जात होतो. त्या वेळी आश्रमातील सभागृहात मला बालसाधिका कु. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ६ वर्षे, वर्ष २०२० मध्ये आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) दिसली. तिने परकर-पोलके असा छानसा नवीन पेहराव केला होता. मी तिला सहज विचारले, ‘‘काय गं, आज काय विशेष आहे ? तू नवीन पोषाख घातला आहेस.’’ त्यावर ती मला म्हणाली, ‘‘आज कुमारिकापूजन आहे.’’ त्या बालसाधिकेचे उत्तर ऐकून मी आश्चर्यचकीत झालो.

३. स्वप्नात दिसलेली ती कुमारिका, म्हणजे देवीच असल्याचे लक्षात येणे

मला स्वप्नात दिसलेली ती कुमारिका, म्हणजे देवीच होती आणि तिने मला कुमारिका रूपामध्ये दर्शन दिले. त्या वेळी माझ्या अंगावर रोमांच आले आणि देवीप्रती कृतज्ञता व्यक्त होऊन माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. देवीने मला कुमारिका रूपात दर्शन दिले आणि एका लहानशा कुमारिकेच्या माध्यमातूनच त्याची मला जाणीव करून दिली.

आदल्या दिवशी ‘अष्टमीला कु. ऋग्वेदी हिचे आश्रमात कुमारिकापूजन केले होते’, हे नंतर मला तिच्या आईकडून समजले.’

– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१५.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक