श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे दर्शन घेतांना ‘देवीची मूर्ती आणि तिच्या शेजारी ठेवलेले त्रिशूळ यांच्यातून देवीतत्त्व प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे

१. ‘श्री भवानीदेवीची मूर्ती अत्यंत जागृत असून ब्रह्मांडातील चैतन्य आणि देवीतत्त्व यांचा प्रवाह मोठ्या प्रमाणात श्री भवानीदेवीच्या मूर्तीत येत आहे अन् हा प्रवाह मूर्तीतून वातावरणात प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे

श्री भवानीदेवीची मूर्ती

‘१५.३.२०२२ या दिवशी मी श्री भवानीमातेच्या मूर्तीचे दर्शन घेत होते. तेव्हा ‘ती मूर्ती अत्यंत जागृत असून तेथील स्थान व्यापक आहे’, असे मला जाणवत होते. ‘मला असे का जाणवत आहे ?’, ते मी पहाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘ब्रह्मांडातील चैतन्य आणि देवीतत्त्व यांचा प्रवाह मोठ्या प्रमाणात भवानीदेवीच्या मूर्तीत येत आहे अन् हा प्रवाह मूर्तीतून वातावरणात प्रक्षेपित होत आहे. त्यामुळे ब्रह्मांडातील व्यापकता त्या स्थानी अनुभवता येत होती.’

२. देवीच्या मूर्तीशेजारी असलेल्या ‘त्रिशुळात ब्रह्मांडामधील शक्ती ग्रहण केली जात असून त्यातून ती वातावरणात प्रक्षेपित केली जात आहे’, असे जाणवणे

सौ. स्वाती शिंदे

देवीच्या मूर्तीच्या शेजारी त्रिशूळ आहे. त्या त्रिशुळामध्ये प्रचंड शक्ती आहे. त्रिशुळामध्ये शक्ती असण्याचे कारण जाणण्याचा प्रयत्न केला असता माझ्या लक्षात आले, ‘ब्रह्मांडातील शक्ती त्रिशुळात ग्रहण केली जात असून त्यातून ती वातावरणात प्रक्षेपित केली जात आहे.’ ‘शक्ती ग्रहण करणे आणि प्रक्षेपित करणे’, असे त्या त्रिशुळाचे कार्य अखंड चालू होते. ते शक्तीचे दळणवळण मला प्रत्यक्ष दिसत आहे’, असे अनुभवता आले. एखाद्या ठिकाणी विद्युत् रोषणाई केलेली असतांना जसे दिसते, तसे ते दृश्य विलोभनीय होते.

३. देवीची मूर्ती सजीव भासून तिच्याशी जवळीक साधली जाऊन तिला मनातील सर्वकाही सांगता येणे

मला भवानीदेवीची मूर्ती इतकी सजीव भासत होती की, माझ्याही नकळत सहजतेने मी तिला माझ्या मनातील सर्वकाही सांगू लागले. मला देवीशी पुष्कळ जवळीक वाटत होती. मी तिचे दर्शन केवळ४ – ५ मिनिटे घेतले, तरीही मला तिच्याशी अनुसंधान साधता आले. इतकी तिची कृपा केवळ श्री गुरूंच्या आशीर्वादाने मी अनुभवू शकले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक