राज्यभरात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन करणार ! – सुनील घनवट, प्रवक्ते, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती

डावीकडून नामदेव उरकुडे, सुनील घनवट आणि रोडमाल गहलोत

चंद्रपूर – भारत एक धर्मनिरपेक्ष देश असतांना देशात धर्माच्या नावावर समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून निर्माण केली जात आहे. या हलाल अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्राची सुरक्षा यांना धोका निर्माण झाला आहे. हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. समितीच्या वतीने येथे २२ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेला विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाप्रमुख रोडमाल गहलोत आणि समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नामदेव उरकुडे, तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. घनवट म्हणाले, ‘‘देशातील केवळ १५ टक्के असणार्‍या मुसलमान समाजाला इस्लामवर आधारित हलाल हवे आहे; म्हणून उर्वरित ८५ टक्के गैरइस्लामी जनतेवर ते लादणे, हे त्यांच्या घटनात्मक धार्मिक अधिकारांच्या आणि ग्राहक अधिकारांच्या विरोधात आहे. त्यामुळे भारत सरकारने ‘रेल्वे सेवा’ आणि ‘पर्यटन महामंडळ’ यांसारख्या ज्या ‘सेक्युलर’ संस्थांमध्ये ‘हलाल’ अन्नपदार्थ पुरवले जातात, ते त्वरित बंद करण्याचे आदेश शासनाने काढावेत. ‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’ यांसारख्या खासगी बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून १०० टक्के हलाल पदार्थांची विक्री होत आहे, तेही पूर्णपणे बंद व्हावे. या प्रकारांच्या विरोधात प्रत्येक जिल्ह्यात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन करून त्याद्वारे व्यावसायिक आणि जनता यांच्यात जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे.’’