गुरुकृपेने पितृपक्षात रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या महालय श्राद्धाच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती !

‘१७.९.२०२२ या दिवशी आम्ही रामनाथी आश्रमात महालय श्राद्ध केले. हे श्राद्ध चालू असतांना मला आलेल्या अनुभूती आणि त्यांच्यामागील उमगलेले शास्त्र येथे देत आहे.

कु. मधुरा भोसले

१. श्राद्धाच्या ठिकाणी शेषनागाचे अस्तित्व जाणवण्यामागील कार्यकारणभाव

श्राद्धाच्या ठिकाणी शेषनागाचे अस्तित्व जाणवत होते. त्याच्या सहस्र फण्यांखाली आमच्यासह अन्य साधकांच्या पितरांसाठी सहस्र पिंड मांडलेले दृश्य मला सूक्ष्मातून दिसले. यामागील कारण देवाला विचारल्यावर देवाने सांगितले की, ‘शेषनाग दैवी असल्यामुळे त्याची निर्मिती सत्ययुगात झाली आणि तो अनेक कुळांचा आदिपुरुष आहे. त्यामुळे त्याला ‘आदिनाग’ असेही म्हणतात.

२. विविध योनींमध्ये पितर येऊन त्यांनी श्राद्धातील भोजन ग्रहण केल्याचे जाणवणे

श्राद्धाच्या ठिकाणी विविध साधकांचे पितर कावळा, चिमणी, कबुतर, श्वान आणि नाग यांच्या रूपांत सूक्ष्मातून येऊन श्राद्धात पितर ब्राह्मणांसाठी वाढलेल्या केळीच्या पानातील भोजन सूक्ष्मात येऊन ग्रहण करत असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांची क्षुधा शांत झाली. ‘काही पितर मनुष्य रूपात, तर काही ऋषींच्या रूपात येऊन भोजन ग्रहण करत आहेत’, असेही मला जाणवले. तेव्हा ‘पितरांना जी योनी प्राप्त होते त्या योनीत ते श्राद्धस्थानी येऊन भोजन ग्रहण करतात’, असे देवाने मला सांगितले.

३. श्राद्धाच्या ठिकाणी ‘धूरिलोचन आणि पुरुरव-आर्द्रव’ या नावाचे दोन वैश्वेदेवांचे दर्शन होणे

श्राद्धाच्या ठिकाणी धूरिलोचन आणि पुरुरव-आर्द्रव या नावाचे दोन वैश्वेदेव अन् पितरांचे अधिष्ठात्री देव आले होते. यांतील ‘धुरिलोचन’ धिप्पाड असून त्याची कांती राखाडी रंगाची होती आणि ‘पुरुरव-आर्द्रव’ याची अंगकाठी नाजूक असून त्याची कांती पिवळसर होती. यांनी देवब्राह्मणांसाठी वाढलेल्या केळीच्या पानांतील भोजनाचा केवळ सुगंध घेऊन ते ग्रहण केल्याचे जाणवले. धुरिलोचनाकडे पितरब्राह्मणांचे आणि पुनर्नवाकडे देवब्राह्मणांचे दायित्व असल्यामुळे त्यांचे रूप संबंधित ब्राह्मणांच्या रूपाशी निगडित असल्याचे जाणवले.

४. श्राद्धाच्या ठिकाणी काळे नाग, पिशाच आणि श्री दत्तगुरु यांच्यामध्ये सूक्ष्मातून युद्ध होणे

पाताळातील काळे नाग आणि पिशाच श्राद्धविधीमध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी श्राद्धकर्ता, पुरोहित आणि दर्भांवर मांडलेले पिंड यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमणे करत होते. श्राद्धाला उपस्थित असणार्‍या साधकांचा भाव, श्राद्ध करवून घेणार्‍या पुरोहितांची धर्मशास्त्रावरील श्रद्धा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संकल्प यांच्यामुळे श्राद्धाच्या ठिकाणी ठेवलेल्या सनातन-निर्मित श्री दत्ताच्या सात्त्विक चित्रामध्ये दत्ततत्त्वही पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले होते. श्री दत्ताच्या चित्रातून सोनेरी रंगाचे त्रिशूळ काळ्या नागांच्या दिशेने जाऊन त्यांच्याशी लढत होते आणि नागांची शक्ती क्षीण झाल्यावर ते पाताळात निघून गेले. त्याचप्रमाणे श्रीदत्तगुरूंनी पिशाच्यांच्या दिशेने पवित्र भस्म फुंकल्याने पिशाच विरघळून गेले. अशा प्रकारे श्राद्धाच्या ठिकाणी सूक्ष्मातून युद्ध झाले.

५. कश्यपऋषींनी स्वप्नदृष्टांताद्वारे साधिकेला तिचे गोत्र ‘कश्यप’ नसून ‘विश्वामित्र’ असल्याचे सांगणे

आतापर्यंत मला ठाऊक होते की, आमचे गोत्र ‘कश्यप’ आहे. श्राद्धविधीच्या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडले. या स्वप्नामध्ये मला असे दिसले की, कश्यपऋषींचे दर्शन घेण्यासाठी विश्वामित्र ऋषि त्यांच्या आश्रमात आले आहेत. परशुरामाने कश्यपऋषींना दान दिलेल्या पृथ्वीवर विश्वविजय मिळवण्यासाठी जाण्यापूर्वी विश्वामित्र ऋषि कश्यपऋषींच्या दर्शनासाठी आले होते. तेव्हा त्यांना विश्वविजय करण्याचा आशीर्वाद देत कश्यपऋषींनी विश्वामित्र ऋषींना पिंपळाच्या समिधांची एक मोळी दिली आणि सांगितले, ‘ही मोळी तुझ्याबरोबर ठेव. ज्या ठिकाणी या मोळीतील समिधा आपोआप पडतील, त्या ठिकाणी तुझे एक रूप मूळपुरुष बनून कार्य करील आणि त्यातून क्षत्रिय कुळाची निर्मिती होईल. या कुळातूनच पराक्रमी राजांची निर्मिती होऊन ते विविध प्रांत किंवा देश यांवर तुझे प्रतिनिधी बनून राज्य करतील. अशा प्रकारे जेव्हा या मोळीतील सर्व समिधा संपतील, तेव्हा तुझी विश्वविजयाची मोहीम पूर्ण होईल.’’ कश्यपऋषींनी सांगितल्याप्रमाणे विश्वामित्र ऋषींच्या जवळील एक मोळी महाराष्ट्रातील ‘माहूर’ या तीर्थक्षेत्री पडून त्यातून यदुवंशातील ‘यादव’ या कुळाची निर्मिती झाली. यातून यदुसारखे अनेक पराक्रमी राजे निर्माण झाले. त्यानंतर या कुळाची एक शाखा पश्चिमेकडे गेली आणि त्यातून ‘भोसले’ या कुळाची निर्मिती झाली. या कुळात शहाजी भोसले, हिंदवी राज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी इत्यादी होऊन गेले. या कुळाच्या एका शाखेत सनातनचे साधक (डॉ.) भिकाजी भोसले यांचे कुटुंब जन्मास आले. या कुटुंबियांनी मागील जन्मात श्रीविष्णूच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तप केले होते. त्यामुळे त्यांचा जन्म भोसले कुळात झाला. त्यांच्या रूपाने विश्वामित्र ऋषींनी कलियुगातील श्रीविष्णूच्या अंशावताराकडून होणार्‍या धर्मसंस्थापनेच्या कार्यात योगदान देण्याचे मनोरथ पूर्ण झाल्याचे कश्यपऋषींनी अंतर्ज्ञानाने मला सांगितले. अशा प्रकारे आमचे भ्रम दूर करून आमचे गोत्र कश्यप नसून विश्वामित्र असल्याचे स्वत: कश्यपऋषींनी मला स्वप्नदृष्टांद्वारे महालयश्राद्धाच्या दिवशी पहाटे दिले’, यासाठी मी कश्यपऋषींच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.

कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे दत्तगुरु, आपल्या कृपेने समस्त तीर्थांचे तीर्थराज असणार्‍या रामनाथी आश्रमामध्ये आमच्या पितरांसाठी महालय श्राद्धविधी झाला’, यासाठी मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे. आपली कृपादृष्टी आम्हा सर्व कर्महिंदूंवर अशी राहो’, हीच आपल्या श्रीचरणी प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक