१६.४.२०२२ या दिवशी नाशिक येथील सनातनचे साधक श्री. नीलेश नागरे आणि त्यांचे कुटुंबीय माहूर येथील श्री रेणुकादेवीच्या दर्शनाला गेले होते. तेथून परत येतांना देवाच्या कृपेने ते आणि त्यांचे कुटुंबीय एका मोठ्या अपघातातून वाचले. या संदर्भात त्यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
१. चारचाकी वाहनाने माहूरला श्री रेणुकादेवीच्या दर्शनाला जातांना वाहनदेवता आणि मार्गातील स्थानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता यांना प्रवास सुखरूप होण्यासाठी प्रार्थना करणे
‘१६.४.२०२२ या दिवशी आम्ही आमच्या वैयक्तिक चारचाकी वाहनाने माहूरला श्री रेणुकादेवीच्या दर्शनाला गेलो होतो. आम्ही निघण्यापूर्वी वाहनदेवतेला ‘हे वाहनदेवते, आमच्याभोवती तुझे अभेद्य असे संरक्षककवच निर्माण होऊ दे. तूच आम्हा सर्वांना सुखरूप घेऊन जा’, अशी प्रार्थना करत होतो. आम्ही माहूरगडाहून शेगावला गेलो. मार्गात आम्ही त्या त्या ठिकाणची स्थानदेवता, वास्तुदेवता आणि ग्रामदेवता यांना प्रार्थना करत होतो.
२. प्रवासात २५ टनाचा लोखंडाचा गोळा घेऊन येणार्या एका मोठ्या ट्रकने जोरात धडक देणे आणि कुटुंबीय घाबरलेले असतांना साधकाचे मन शांत अन् स्थिर असणे
आम्ही शेगाव ते जालना असा प्रवास करत होतो. जालना शहराच्या आधी १ कि.मी. अंतरावर आमच्या चारचाकी वाहनाच्या मागे एक १६ चाकी मोठा ट्रक येत होता. त्या ट्रकवर २५ टन वजनाचा लोखंडाचा गोळा होता. तो ट्रक आमच्या गाडीच्या मागून डाव्या बाजूने (ओव्हरटेक करत) वेगाने पुढे आला आणि त्याने आमच्या चारचाकी वाहनाच्या पुढच्या चाकाला जोरात धडक दिली. त्यानंतर तो पुढे जाऊन उलटला. त्या धक्क्यामुळे गाडीत झोपलेले माझे कुटुंबीय खडबडून जागे झाले. ते सर्वजण घाबरले होते; परंतु माझे मन शांत आणि स्थिर होते. मी सर्वांना शांत रहाण्यास सांगितले. त्या वेळी माझी पत्नी सौ. ज्योती नागरे ही श्रीकृष्णाचा धावा करत होती.
३. एवढ्या मोठ्या ट्रकने धडक दिल्यावरही गाडीतील कुणालाही दुखापत न होणे आणि चारचाकी गाडीचीही किरकोळ हानी होणे
१६ चाकांच्या त्या मोठ्या ट्रकने आमच्या गाडीला धडक दिल्यावर आमच्या संपूर्ण गाडीचा चक्काचूरच होऊ शकला असता; परंतु आमच्या गाडीच्या चाकाची किरकोळ हानी झाली होती. आमच्या गाडीतील कुणालाही दुखापत झालेली नव्हती. आमची गाडी उलटून न पडता उलट तो अवजड ट्रकच उलटला होता. अपघात झाल्यावर लगेच त्या ठिकाणी लोक जमा झाले. ‘एवढ्या मोठ्या ट्रकची धडक बसूनही आमच्या गाडीतील कुणालाही दुखापत झाली नाही’, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले.
४. प्रार्थनेचे महत्त्व लक्षात येणे आणि ‘भगवंत भक्ताच्या साहाय्याला धावून येतो’, याची प्रचीती येणे
त्या क्षणी मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे स्मरण झाले. ‘भगवंत भक्ताच्या साहाय्याला धावून येतो’, याची मला प्रचीती आली होती. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे ‘प्रार्थनेमध्ये किती शक्ती असते !’, याची मला अनुभूती आली. श्रीकृष्ण, हनुमान आणि वाहनदेवता यांना प्रार्थना केल्यामुळे आमच्यावर आलेले संकट वाहनदेवतेने स्वतःवर घेऊन आम्हा सर्वांचे रक्षण केले.
५. अपघाताच्या वेळी जाणवलेली सूत्रे
अ. अपघाताच्या दुसर्या दिवशी हनुमान जयंती होती. त्यामुळे ‘हनुमंताने आमच्या गाडीचे रक्षण केले’, असे मला वाटले. ‘ट्रक आमच्या चारचाकी वाहनाला धडकत असतांना प्रत्यक्ष हनुमंताने ट्रकला दोन्ही हातांनी दूर केले’, असे मला जाणवले.
आ. मला सूक्ष्मातून भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचेही अस्तित्व जाणवले.
आमचे या प्राणघातक अपघातातून रक्षण केल्याविषयी माझ्याकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सर्व देवता यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. नीलेश नागरे, नाशिक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४२ वर्षे) (७.८.२०२२)
|