साधकांनो, अमूल्य असा मनुष्यदेह आहे, तोपर्यंतच साधना आणि गुरुसेवा करू शकत असल्याने प्राप्त परिस्थितीतच झोकून देऊन साधना करा !

श्री. सुमित सरोदे

१. मनात संघर्ष होत असतांना पडलेल्या स्वप्नात स्वतःचा देह मृतावस्थेत दिसणे, त्या देहामध्ये प्रवेश करता न येणे आणि त्या स्थितीत सेवा अन् नामजप करण्याचा प्रयत्न केल्यावर तोही करता न येणे

‘२१.८.२०२० या दिवशी मी ध्यानमंदिरात उपायांना बसलो होतो. तेव्हा माझ्या मनात पुष्कळ संघर्ष चालू होता. माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येत होते. त्याच स्थितीमध्ये मला झोप लागून एक स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये ‘मला माझा देह हा मृतावस्थेत असल्याचे दिसले आणि मी आत्म्याच्या रूपात देहाच्या बाहेर आल्याचे दिसले. माझा आत्मा त्या देहात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता; परंतु त्याला प्रवेश करता येत नव्हता. त्यानंतर ‘मी तो प्रयत्न सोडून दिला आणि सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे’, असे मला दिसले. सेवा करतांना ‘आश्रमातील झाडांना पाणी घालावे’, असा विचार माझ्या मनात आला; परंतु मला कुठल्याच मार्गाने बालदी उचलता येईना. पाण्याचा नळही चालू करता येत नव्हता. मी हे सर्व सोडून दिले. माझ्या मनात ‘बसून नामजप करावा’, असा विचार आला; परंतु नामजप करतांनाही मला शब्द ऐकू येत नव्हते. माझे बोलणेच मला ऐकू येत नव्हते.’ एवढे झाल्यावर मला जाग आली.

२. ‘देह सोडून जातांना पृथ्वीवर असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला सोडून जाव्या लागतात आणि हा अमूल्य देह असेपर्यंतच गुरुसेवा अन् साधना करू शकतो’, हे या अनुभूतीमधून शिकायला मिळणे

या अनुभूतीमधून मला बरेच काही शिकायला मिळाले. ‘बाह्य विश्व हे देहाला बघत असते. मृत्यू ही कल्पनाही बाहेरच्या मायावी विश्वात त्रासदायक ठरते. देहाच्या पलीकडेही आपण आहोत. देह नसला, तरी आपण आत्म्याच्या रूपात असणार आहोत’, हे यातून मला अनुभवायला मिळाले. तेव्हा मला मानवी जीवन आणि ईश्वरी कृपेने लाभलेल्या मानवी देहाचे मोल कळले. देह सोडून जातांना इथे असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला सोडून जाव्या लागतात. समवेत काही नेता येत नाही. समवेत केवळ एकच गोष्ट घेऊन जाऊ शकतो, ती म्हणजे साधना ! आपली साधना ही आपली खरी संपत्ती आहे. ‘आपला देह हा अमूल्य आहे. देह आहे, तोपर्यंतच आपण गुरुसेवा आणि साधना करू शकतो. देह नसेल, तर आपल्याला गुरुसेवा करण्याचे भाग्य प्राप्त होणार नाही’, हे मला यातून प्रकर्षाने शिकायला मिळाले.

३. कृतज्ञता

‘मला आश्रमात रहायला मिळत आहे. गुरूंची सेवा करायला मिळत आहे’, याविषयी कृतज्ञता वाटून माझा भाव जागृत झाला. ‘आपले परात्पर गुरु डॉक्टर किती महान आहेत ! त्यांनी या कलियुगातील जिवांकडून साधना करून घेण्यासाठी आश्रमांची स्थापना केली. त्यामुळे आपल्याला अखंड साधना करता येत आहे’, याविषयी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत होती. ‘हे गुरुदेवा, या आपत्काळामध्ये तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिलीत. तुम्ही आम्हाला साधनेत आणलेत. ‘साधना कशी करायची ?’, हे शिकवलेत. मनुष्यजन्माचे ध्येय आमच्या मनावर बिंबवलेत. धर्मसेवा, राष्ट्रसेवा आणि त्या समवेतच गुरुसेवा करण्याची संधी दिलीत. हे गुरुदेवा, याविषयी आम्ही तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

४. प्रार्थना

‘हे गुरुदेवा, या देहाचा शेवटचा श्वास असेपर्यंत आम्हाला सतत गुरुसेवा करता येऊ दे. तुम्हीच आमच्याकडून गुरुसेवा भावपूर्ण आणि झोकून देऊन करून घ्या. आम्ही अनन्यभावे आपल्याला शरण आलो आहोत. आम्हा सर्व साधकांचा देह असेपर्यंत आमची प्रगती करून घ्या. आमचे सर्व स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी आम्हाला शक्ती अन् बुद्धी द्या. आम्हाला साधनेचा आणि ईश्वरप्राप्तीचा आनंद अनुभवता येईल, अशी पात्रता आमच्यात निर्माण करा’, अशी तुमच्या कोमल चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’

– श्री. सुमित भागवत सरोदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.९.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक