सोलापूर, १८ सप्टेंबर (वार्ता.) – पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये समाविष्ट कामाविषयी १२ सप्टेंबर २०२२ या दिवशी खासदार, आमदार, मंदिर समितीचे विश्वस्त, पालखी सोहळ्याचे विश्वस्त, व्यापारी प्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. आराखड्याविषयी आणखी काही सूचना असतील, तर लेखी स्वरूपात २६ सप्टेंबर २०२२ पर्यंत देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
आराखड्याविषयी लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पालखी सोहळा प्रमुख, नागरिक, व्यापारी संघटना, वारकरी, पत्रकार यांना सूचना करावयाच्या असल्यास लेखी स्वरूपात [email protected] आणि [email protected] या संगणकीय पत्त्यावर २६ सप्टेंबरपर्यंत पाठवाव्यात. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रत मंदिर समिती कार्यालय, पंढरपूर तुकाराम भवन, पंढरपूर नगर परिषद, मंगळवेढा नगर परिषद, उपविभागीय कार्यालय अकलूज येथे अवलोकनार्थ उपलब्ध आहे. या ठिकाणीही लेखी स्वरूपात सूचना देता येतील, असेही शंभरकर यांनी सांगितले आहे.