साजिद मीर याला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करण्यात चीनचा अडथळा

साजिद मीर(डावीकडे )

नवी देहली – मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणात सहभागी असलेला लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी साजिद मीर याला जागतिक आतंकवादी म्हणून घोषित करण्यात चीन अडथळा आणत आहे. मीर याला काळ्या सूचीत टाकण्याचा प्रस्ताव अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसमोर ठेवला होता आणि भारताने त्याचे समर्थन केले होते; परंतु चीनने त्याला विरोध केला आहे.

१. मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी पाकिस्तानने अद्याप मीरवर गुन्हा नोंद केलेला नाही.

२. भारताच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ आतंकवाद्यांच्या सूचीत साजिद मीरचा समावेश आहे.

३. अमेरिकेने मीरला शोधून देण्यासाठी ५० लाख डॉलरचे पारितोषिक घोषित केले आहे. २६/११च्या आक्रमणातील मृतांमध्ये ६ व्यक्ती अमेरिकेच्या नागरिक असल्याने अमेरिकेला साजिद मीरला पकडायचे आहे.

४. चीनने यापूर्वीही भारत आणि इतर देशांचे आतंकवादाच्या विरोधातील ठराव संमत करण्यात अडथळे आणले होते.

५. गेल्या मासात जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अजहर याचा भाऊ आणि पाकिस्तानस्थित आतंकवादी संघटनेचा म्होरक्या अब्दुल रौफ अजहर याला काळ्या सूचीत टाकण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला चीनने तांत्रिक कारण पुढे करून अडथळा आणला होता.

६. यापूर्वी मसूद अजहरला जागतिक आतंकवादी घोषित करण्याच्या प्रस्तावातही चीन अडथळा ठरला होता.

७. मीरविषयी पाकिस्तान नेहमीच खोटे बोलत आला आहे. प्रारंभी पाकिस्तानने मीर पाकिस्तानात असल्याचे वृत्त नाकारले होते. या वर्षी जूनमध्ये मीरला कह्यात घेतल्याचे वृत्त पाकिस्तानने प्रसिद्ध केले होते.

संपादकीय भूमिका

देशातील आतंकवाद नष्ट करण्याच्या प्रक्रियेत सातत्याने अडथळा आणणार्‍या चीनच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई होणे आवश्यक !