नांदेड येथे उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांचा गोंधळ !

पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार !

प्रतीकात्मक छायाचित्र

नांदेड – १७ सप्टेंबर या दिवशी ‘हैदराबाद मुक्तीसंग्राम दिना’च्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे आले होते. त्यांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. ‘रखडलेली पोलीस भरती झालीच पाहिजे’, अशी घोषणा विद्यार्थ्यांनी या वेळी केली. या वेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार केला.

कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याचा आढावा घेणार्‍या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बाहेर येताक्षणी काही विद्यार्थ्यांनी घोषणा देण्यास प्रारंभ केला. ‘गेल्या ५ वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती कधी चालू होणार?’, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना घेराव घातला; मात्र ते काहीही न बोलताच तिथून निघून गेले.

या प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, आम्ही पोलीस आणि शिक्षक भरती काढल्या होत्या. दुर्दैवाने शिक्षक भरतीत भ्रष्टाचार झाल्याने ती थांबवावी लागली. पुढे पुन्हा भरती करायचे ठरवले होते; पण आमचे सरकार गेले. आज आपण सरकारमध्ये सर्व प्रकारच्या ७५ सहस्र रिक्त जागा भरू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ मासापूर्वी पोलीस भरतीची घोषणा केली होती. ‘राज्यात ७ सहस्र ५०० पदांसाठी लवकरच पोलीस भरती प्रक्रिया राबवणार आहे’, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे, तसेच गृह विभागाचे सचिव आणि इतर अधिकारी यांना तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना दिल्या आहेत’, असेही त्यांनी सांगितले होते.