साधिकेने साधिकेने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा नामजप केल्याने तिला उत्साह जाणवणे आणि तिला सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

१. पितृपक्षात उत्साह जाणवणे आणि ‘पूर्वजांना गती मिळावी’, यासाठी दत्तगुरूंना प्रार्थना होणे

श्रीमती मधुरा तोफखाने

‘वर्ष २०२० च्या पितृपंधरवड्यात मला त्रास जाणवला नाही. मी सकारात्मक होते. मला एक प्रकारचा उत्साह जाणवत होता. माझ्याकडून सांगितलेला नामजप प्रतिदिन एक घंटा होत होता. माझ्याकडून व्यष्टी साधनेची सर्व सूत्रे पूर्ण होत होती. त्यामुळे माझे मन उत्साही होते. ‘दत्तात्रेयांनी पूर्वजांना गती द्यावी आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळावेत’, यासाठी माझ्याकडून सातत्याने प्रार्थना होत होती. माझे माहेरच्या आणि सासरच्या व्यक्तींशी बोलणे झाल्यावर पूर्वजांच्या आठवणी निघत होत्या. त्या वेळी ‘पूर्वजांना गती मिळावी’, अशी माझी मनातून आपोआप प्रार्थना होत होती.

२. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी पहाटे सद्गुरु स्वाती खाडये यांच्या समवेत नामजप करतांना सूक्ष्मातून दत्तगुरूंचे दर्शन होणे आणि ‘दत्तगुरु पूर्वजांना गती देत आहेत’, असे जाणवणे अन् ‘नामजप कधी संपला ?’,  हे लक्षात न येणे

वर्ष २०२० च्या सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी पहाटे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतांना मला दत्तगुरूंचे दर्शन झाले. (त्या दिवशी पहाटे पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतील साधकांसाठी ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप आयोजित करण्यात आला होता.) सद्गुरु स्वाती खाडये या वेळी उपस्थित होत्या. मला सूक्ष्मातून दिसले, ‘दत्तगुरूंच्या मागे पुष्कळ जण आहेत. दत्तगुरु आकाशमार्गाने येत आहेत. दत्तगुरूंनी काही व्यक्तींना मध्येच उतरवले आणि पुढे गेल्यावर आणखी काही व्यक्तींना उतरवले.’  त्या वेळी मला जाणवले, ‘या अनेक व्यक्ती म्हणजे पूर्वज आहेत. दत्तगुरु पूर्वजांना त्यांच्या कर्माप्रमाणे गती देऊन अंतर्धान पावले आहेत.’ मला हे सर्व दिसत असतांना नामजपाची वेळ संपली; मात्र मला ‘नामजप चालू होऊन केवळ ५ मिनिटे झाली आहेत’, असे वाटले. मला ‘नामजप कधी संपला ?’, हे समजलेच नाही.’

– श्रीमती मधुरा तोफखाने, सांगली (सप्टेंबर २०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक