रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात श्राद्धविधी करतांना आलेल्या अनुभूती

१. श्राद्धविधीच्या वेळी आलेली अनुभूती

श्री. अजित तावडे

१ अ. पाठदुखीचा तीव्र त्रास असतांना श्राद्धविधीसाठी ४ – ५ घंटे मांडी घालून बसूनही काहीच त्रास न होणे : ‘२३.९.२०२१ या दिवशी रामनाथी आश्रमात महालय श्राद्धविधी होता. हा विधी सकाळी १० ते दुपारी २.४५ पर्यंत होता. मला पाठदुखीचा तीव्र त्रास असल्याने मी मांडी घालून जेमतेम १५ ते २० मिनिटेच बसू शकतो; पण हा विधी करतांना मी ४ – ५ घंटे मांडी घालून बसूनही मला पाठदुखीचा काहीच त्रास झाला नाही.

१ आ. सनातनचे पुरोहित श्राद्धविधी पुष्कळ भावपूर्ण सांगत असल्याने ‘मी देवघरातील मूर्तींची भावपूर्ण पूजा करत आहे’, असे मला वाटले.

२. श्राद्धविधीनंतर आलेल्या अनुभूती

२ अ. श्राद्धविधी झाल्यानंतर मला पुष्कळ हलके वाटले.

२ आ. श्राद्धविधी झाल्यावर मला दोन साधकांनी सांगितले, ‘‘तुमच्या चेहर्‍यावर चांगला पालट जाणवत आहे.’’

३. इतर सूत्रे

३ अ. हिंदु धर्मातील श्राद्धविधी करण्यामागील व्यापक विचार लक्षात आल्यावर कृतज्ञता वाटणे : आपल्या पूर्वीच्या काही पिढ्यांत, तसेच आपल्या मागील काही जन्मांतही काही कारणास्तव श्राद्धविधी होत नाहीत. त्यामुळे पूर्वजांना पुढील गती मिळत नाही. विधीच्या वेळी पुरोहितांनी सांगितले, ‘‘अशा गती न मिळालेल्या पूर्वजांसाठीही पिंड ठेवला आहे.’’ ते ऐकून ‘हिंदु धर्मात सर्वांचा किती व्यापक आणि सखोल विचार केला आहे’, हे माझ्या लक्षात आले आणि मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

‘परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला रामनाथी आश्रमामध्ये भावपूर्ण श्राद्धविधी करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. अजित तावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१०.१०.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक