ब्रॅम्पटन (कॅनडा) येथील स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तानी आतंकवाद्यांचे आक्रमण !

  • मंदिरात तोडफोड करून भिंतींवर लिहिले ‘खालिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद’ !

  • भारताकडून निषेध व्यक्त, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी !

कॅनडा येथील स्वामीनारायण मंदिर

टोरंटो (कॅनडा) – खलिस्तानी आतंकवाद्यांनी १४ सप्टेंबर या दिवशी ब्रॅम्पटन शहरातील स्वामीनारायण मंदिरात तोडफोड करून मंदिराच्या भिंतींवर ‘खालिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद’ लिहिले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. भारताने या घटनेला ‘घृणास्पद अपराध’ संबोधून कॅनडाकडे आरोपींच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याचा आग्रह केला आहे.

१. ब्रॅम्पटनचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांनी या घटनेसाठी दु:ख व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

२. दुसरीकडे कॅनडातील हिंदु खासदार चंद्र आर्या यांनी या घटनेवरून ‘कॅनडाई हिंदू’ या घटनेवरून चिंतित असल्याचे म्हटले आहे. या घटनेची सर्वांनी निंदा केली पाहिजे. ‘ही केवळ एकच घटना नसून गेल्या काही काळात हिंदूंच्या मंदिरांवर अशा प्रकारे आक्रमण करणार्‍या अन्य घटनाही घडल्या आहेत’, असेही ते म्हणाले.

जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्येही ६ मंदिरांवर झाली होती आक्रमणे !

याआधी जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्येही खलिस्तानी आतंकवाद्यांनी टोरंटोतील ६ मंदिरांवर आक्रमण केले होते. या वेळी मंदिरांमधील दानपेट्यांतून पैसे, तसेच देवतांच्या मूर्तींवरील अलंकारही चोरण्यात आले होते. यामध्ये ब्रॅम्पटन शहरातील हनुमान मंदिर, तसेच मां चिंतापूर्णी मंदिर यांचा समावेश होता. (कॅनडात एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होत असतांना ते रोखण्यासाठी तेथील सरकारने काय केले ? – संपादक)

संपादकीय भूमिका

कॅनडा हा खलिस्तानवादी आतंकवाद्यांचा अड्डा बनल्याने तेथे अशा घटना घडल्यास आश्‍चर्यचकित होण्यासारखे काही नाही; परंतु आता भारताने कॅनडाकडे केवळ तीव्र शब्दांत निषेध नोंदवून गप्प न बसता त्याला समजेल अशा भाषेत त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित !