नामजप करतांना साधिकेच्या मनात काव्यात्मक विचार येणे आणि जीवनात पहिल्यांदाच २ कविता लिहिल्या जाणे !

‘११.६.२०२२ या दिवशी सकाळी मी नामजप करत बसले होते. तेव्हा ‘माझ्या मनात जे विचार येत होते, ते काव्यात्मक आहेत’, असे मला जाणवले. मी आतापर्यंत कधीच कविता केली नाही; पण देवाने नामजप करतांना मला ज्या २ कविता सुचवल्या, त्या मी भराभर लिहिल्या. त्या लिहून झाल्यावर माझ्याकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. त्या कविता पुढे दिल्या आहेत.

(येथे ‘पंचमहाभूतांच्या माध्यमातून देवाला सदैव कसे अनुभवता येते ?’, याची कल्पना केली आहे.)

नाही दूर तू कधी भगवंता ।

सौ. भक्ती गैलाड

नाही दूर तू कधी भगवंता । ग्वाही देत असे या चित्ता ।। १ ।।
पंचभूतांच्या माध्यमातून । तू लिप्त असशी जगतात ।। २ ।।
विशाल झाली ही धरणी । तुझ्या पदन्यासे पावन ती ।। ३ ।।
त्याच पदचिन्हांना नमुनी । कृतज्ञता अनुभवू जीवनी ।। ४ ।।
आपतत्त्व ते क्षीरसागरी । चरणस्पर्श नित्य करी ।। ५ ।।
तीर्थजल ते प्राशन करी । चैतन्य अंतरी बाह्यांतरी ।। ६ ।।
तेजोमय, ज्योतिर्मय, ब्रह्मांड तू । नित्य तेजे घालतो न्हाऊ ।। ७ ।।
ते तेज अवघे भूतलावरी । रविकर अलगद पोचविती ।। ८ ।।
कणाकणांना रे क्षणोक्षणी । तूच दिप्त दैदीप्यमान करी ।। ९ ।।
कान्हा, वेणूनाद ऐकू येतो । अजूनही कानी घुमत रहातो ।। १० ।।
ओठांच्या स्पर्शे वायूमंडल हे । अन् सुखावतो कर्णाते ।। ११ ।।
यापरते तुझी अपार माया । रूप हे गगनभरी ।। १२ ।।
कवटाळून जगताला या ।  प्रीती रसपान सहज करी ।। १३ ।।
अनंता, तू तर साक्षी असशी । वेदोक्ती ही असे काही ।। १४ ।।
पण भक्ताविना भगवंत, भगवंताविना भक्त । असे कधी होणे नाही ।। १५ ।।

– सौ. भक्ती प्रमोद गैलाड, ठाणे (११.६.२०२२)


जन्ममुक्त होण्या बळ तू दिले ।

प्रवास हा सर्वांचा अनंता ।
तुझ्यापासून तुझ्यापर्यंतचा ।। १ ।।

भोगयोनी वा मनुष्ययोनी ।
तूच अदृश्य आधार जगती ।। २ ।।

अहंकाराने आकार ल्यालो ।
जीवनमार्गे बघ धडपडलो ।। ३ ।।

कर्मगती ती प्रारब्ध भोगवी ।
ये आठव आता तुझी वेगी ।। ४ ।।

सोडवी रे मीपणातून आम्हा ।
धावा करी मी पुनःपुन्हा ।। ५ ।।

प्रेमळ तू भक्तवत्सल आहे ।
दया अंतरी उमलत राहे ।। ६ ।।

नाम देऊनी साधन तू दिधले ।
जन्ममुक्त होण्या बळ तू दिले ।। ७ ।।

अनंता, तव अनंत उपकार असती ।
न फिटती ते अनंत जन्मी ।। ८ ।।

कृतज्ञता ८४ लक्ष जन्मांची ।
कशी सांग ना व्यक्त करू ।। ९ ।।

थिटे होतसे आयुष्य आता ।
श्वास बघ नुरतील रे भगवंता ।। १० ।।

तव चरणी ही कृतज्ञतांजली ।
तव कृपेनेच घे अर्पण करूनी ।। ११ ।।

– सौ. भक्ती प्रमोद गैलाड, ठाणे (११.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक