|
संभाजीनगर, १२ सप्टेंबर (वार्ता.) – पैठण येथील संतपिठाचा प्रस्ताव येणार आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हे पीठ होऊन वारकर्यांना न्याय देण्यासाठी बैठकीचे आयोजन करू. सरकारच्या पैशांतून संत ज्ञानेश्वर विद्यापीठ विकसित करू. आतंकवादी याकूब मेमन यांचे हस्तक होण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हस्तक होण्यास काही वाईट नाही. आमच्या सत्तांतराची लढाई सोपी नव्हती. देशद्रोही याकूब मेमन याच्या कबरीचे उदात्तीकरण कुणी केले ? बाळासाहेबांचे विचार नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पुढे नेले आहेत. विरोधकांमध्ये उदासीनता आणि नैराश्य आहे. आम्ही कामातून त्यांना उत्तर देऊ, असे सडेतोड वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ सप्टेंबर या दिवशी पैठण येथे घेतलेल्या जाहीर सभेत व्यक्त केले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की,
१. येथे लोकांच्या विराट गर्दीने दाखवून दिले आहे की, ही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेबांच्या विचारांची खरी सेना आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकांनी वनवास संपल्याची भावना व्यक्त केली. महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे, हे लोकांच्या पसंतीस उतरले आहे.
२. पाणीपुरवठ्याला निधी अल्प पडू देणार नाही. या भागाला न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील वैजापूर-गंगापूर मतदारसंघात मराठवाडा ‘वॉटरग्रीड’साठी संमत झाले आहेत. हे सरकार काम करणारे सरकार आहे. २ मासांत ऐतिहासिक आणि क्रांतीकारी निर्णय घेतले. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री जनतेत फिरत असल्याची भीती त्यांच्या मनात आहे; म्हणूनच विरोधक आरोप आणि टीका करत आहेत.
३. सभेत आलेली सर्व माणसे आपली असून ती आमच्या प्रेमापोटी आलेली आहेत. वर्ष २०१९ मध्ये निवडणुका झाल्या, तेव्हा शिवसेना-भाजप युती निवडणूक लढवली. युतीचे सरकार स्थापन होण्यासाठी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र घेऊन प्रचार केला. युतीचे सरकार येण्याची सर्वांची भावना तिच होती; मात्र विश्वासघात कुणी केला ? मतदारांशी बेईमानी कुणी केली ? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. मतदारांची प्रतारणा आणि आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.
४. पावसामुळे हानीग्रस्त शेतकर्यांना २-३ हेक्टरवरील हानीभरपाई देणार आहोत. तातडीने ५ सहस्रांऐवजी १५ सहस्र रुपये शेतकर्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लंपी’त्वचा आजार प्रकरणी ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे निकष लावण्याचा निर्णय घेतला आहे.
५. शेतकर्यांना न्याय देणारे सरकार आहे. पैठण येथे १०० खाटांचे रुग्णालय उभे करण्याची मागणी पूर्ण केली जाईल.
६. मी राज्याचा विकास करण्याचे, शेतकर्यांच्या हिताचे, लोकांच्या जीवनात पालट घडवण्याचे ‘कंत्राट’ घेतले आहे. पुढील निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे २०० आमदार आल्याविना रहाणार नाही.
विशेष
१. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेल्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडले.