५ लाख ते ८ लाख रुपयांपर्यंत कबर विक्रीचा घोटाळा (?)
मुंबई – मुंबई बाँबस्फोट प्रकरणातील दोषी आतंकवादी याकूब मेमन याची कबर कब्रस्तानचे विश्वस्त शोएब खतीब यांनी याकूब मेमन याचे नातेवाईक रऊफ मेमन यांना विकली असल्याचा आरोप येथील रहिवासी शाहिद शेख यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी कबरीला केलेल्या सजावटीमुळे मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तानमधील याकूब मेमन याची कबर चर्चेत आली आहे.
शाहिद शेख यांनी आरोप करतांना म्हटले आहे की, विश्वस्त शोएब खतीब यांनी मागील २ वर्षांत अनेक कबरी विकल्या आहेत. ५ लाख ते ८ लाख रुपयांपर्यंत कबरी विकण्यात आल्या आहेत. कबर विक्रीचा घोटाळा उघडण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि पोलीस यांनी लक्ष घालावे आणि चौकशी करावी. शोएब खतीब यांना अटक केल्यास याकुब मेमन याची कबर विकण्यामागील सत्य समोर येईल. सजावटीविषयी माहिती पुढे येताच याविषयीचा सर्व तपशील माहिती असलेल्या बडा कब्रस्तानमधील एका व्यवस्थापकाला हटवण्यात आले.
याकूब मेमन याच्या कबरीवर मागील १ वर्षापासून विद्युत् रोषणाई आहे. त्यासाठी एक स्वीच आणि मीटर पुरवण्यात आला आहे. स्थानिकांनी विरोध केल्यावर त्यांना गुन्हेगारी जगतातून धमक्या देण्यात आल्या. याकूब मेमनची कबर करण्याच्या वेळी कब्रस्तानच्या विश्वस्तांच्या कार्यालयात रात्रीच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शालीमार आणि इतर हॉटेल्समधून जेवण आले.