ठाणे, १२ सप्टेंबर (वार्ता.) – एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे. तुम्ही तर घराच्या बाहेरच पडत नव्हता. मुख्यमंत्री प्रशासन चालवतील आणि फिरतीलही ! सुप्रियाताईंनी काळजी करू नये, असा टोला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. ते कल्याण येथे एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना बोलत होते. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार चालवतात कि केवळ फिरतात ?’, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता. यावर चंद्रकांत पाटील यांनी वरील प्रत्युत्तर दिले.
कल्याण तालुक्यातील गोवेली येथील ‘जीवनदीप शैक्षणिक संस्थे’च्या वतीने परिसरातील कीर्तनकारांचा सत्कार सोहळा १० सप्टेंबर या दिवशी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पू. नवनितानंद महाराज, भाजपचे आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार आणि जीवनदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात विज्ञान, कला आणि वाणिज्य या विषयांच्या जोडीला कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे. त्यामुळे एका बाजूने तरुण बुद्धीमान होईल, तर दुसर्या बाजूने त्याला रोजगार मिळेल. त्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून देऊ. अतिशय दुर्गम भागात संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी शिक्षणसंस्था उभी केली. या भागातील विद्यार्थ्यांची आवश्यकता पहाता या भागात कायद्याचे ज्ञान देणारे महाविद्यालय (लॉ कॉलेज) उभे रहायला हवे.