शेतकर्‍यांनो, लंपी आजाराला घाबरू नका ! – अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव

गायी आणि म्हशींमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव

जळगाव, १२ सप्टेंबर (वार्ता.) – जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांत गोवंशियांना मोठ्या प्रमाणात लंपी आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. त्यावर लसीकरण हा उत्तम पर्याय आहे. शासन स्तरावरून बाधित क्षेत्राच्या ५ किलोमीटर परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख २५ सहस्र ९८८ जनावरांना लसीकरण करायचे असून आतापर्यंत १ लाख ११ सहस्र ८०२ एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे. या आजाराचा मानवावर परिणाम होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाबरून न जाता योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पशूसंवर्धन आयुक्त डॉ. श्यामकांत पाटील यांनीही शेतकरी आणि पशूपालक यांना संबोधित केले.

अभिजित राऊत

पत्रकार परिषदेतील काही सूत्रे

१. महाराष्ट्रात ७ सप्टेंबरपासून जनावरांसाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार गुरांचे बाजार, शर्यती, जत्रा यांना प्रतिबंध घालण्यात आला आहे.

२. उपाययोजना म्हणून शेतकर्‍यांनी गोठा स्वच्छता आणि गोचिड निर्मूलन मोहीम राबवावी.

३. बाधित जनावरांवर शासनाच्या स्तरावरून विनामूल्य औषधोपचार करण्यात येणार आहेत.

४. खासगी स्तरावर कुणी पशूवैद्य या आजारावर उपचार करत असल्यास अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

५. या आजाराने जनावरांचा मृत्यू झाल्यास ग्रामपंचायत स्तरावर पशूधन विकास अधिकार्‍यांच्या उपस्थितीत विल्हेवाट लावावी.