रामनाथी आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अनुपमा जोशी (वय ६९ वर्षे) यांना येत असलेल्या अनुभूती

सौ. अनुपमा जोशी

१. पृथ्वीतत्त्वाची अनुभूती

१. सुगंध येणे : मला कधी कधी गोड पदार्थांचा सुगंध येतो. कधी हळद आणि कुंकू यांचा घमघमाट येतो. कधी पिवळा सोनचाफा, झेंडू, शेवंती, गुलाब असे विविध फुलांचे सुगंध येतात. एकदा मला प्रसाधनगृहात गुलाबाच्या फुलांचा सुगंध आला.

२. तेजतत्त्वाची अनुभूती 

मला माझ्या गादीवर बर्‍याच वेळा दैवी कण दिसतात.

३. आकाशतत्त्वाच्या अनुभूती

अ. एखाद्या वेळी आमच्या खोलीतील पंख्यातून वेगवेगळे आवाज ऐकू येतात, उदा. बासरी, वीणा, ‘विठ्ठल-विठ्ठल’ इत्यादी. अन्य साधिकांना आमची खोली मोठी झाल्यासारखी जाणवते आणि शांत वाटते.

आ. विविध नामजप ऐकू येणे : मी सुखासनावर बसले असतांना कधी माझ्या डाव्या कानात, तर कधी उजव्या कानात बर्‍याच वेळा ‘हरे राम, हरे राम । राम राम हरे हरे ।। हरे कृष्ण, हरे कृष्ण । कृष्ण कृष्ण हरे हरे ।’, ‘श्रीराम जयराम जय जय राम’, ‘विठ्ठल, विठ्ठल’, असे नामजप ऐकू येतात.
इ. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन ऐकायला येणे : मी झोपले असतांना अधून-मधून मला प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) मार्गदर्शन किंवा भजन ऐकायला येते. मला शब्द स्पष्ट कळत नाहीत; पण आवाज ऐकू येतो. परात्पर गुरु डॉक्टर यांचेही मार्गदर्शन ऐकायला येते. असे मला दिवसातून २ – ३ वेळा ऐकू येते. कधी कधी मला एखाद्या भजनाचे सूर ऐकू येतात.

४. खोलीतील बाळकृष्णाच्या मूर्तीमध्ये पालट जाणवणे

आमच्या खोलीत बाळकृष्णाची मूर्ती आहे. मी त्याच्याशी प्रतिदिन बोलते. मला तिच्यात बरेच पालट जाणवतात. मला बाळकृष्णाची मूर्ती चकचकीत दिसते. मला बाळकृष्णाच्या अंगावरील दागिन्यांचे प्रतिबिंब त्याच्या अंगावर दिसते. कधी कधी मला तो बाळकृष्ण मोठा दिसतो, तर कधी कधी खोडकर बाळकृष्णासारखा जाणवतो. कधी तो मिस्कीलपणे हसतो, तर कधी मला तो रागावलेलाही दिसतो.

मला या अनुभूती येतात, तेव्हा मला वाटते, ‘माझा भगवंत माझ्या खोलीत आला आहे’ आणि माझे मन पुष्कळ उत्साही अन् आनंदी होते. या सर्व अनुभूतींमुळे मी नेहमीच आनंदी असते.

‘देवा, या अनुभूतींमुळे तू सतत माझ्या समवेत आहेस’, याची मला जाणीव होते. बर्‍याच वेळा माझ्या मनात काहीच विचार नसतात. ‘माझे मन पूर्ण रिकामे आहे’, असे मला वाटते. देवा, मला काही नको. मला केवळ आपल्या चरणांशी ठेव’, हीच प्रार्थना आहे.’

– सौ. अनुपमा जोशी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक