सोलापूर – अन्नधान्य पुरवठा विभागाच्या ‘एई.पी.डी.एस्. महाराष्ट्र’ या संकेतस्थळावर पालट करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्याचे अद्ययावतीकरण चालू आहे. त्यामुळे मागील मासापासून ‘पॉस मशिन’ सातत्याने बंद पडत असल्याने लाभार्थ्यांचे ‘ई-पॉस’वर बोटांचे ठसे घेण्याचे काम बंद आहे. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट मासांचे ९ सहस्र ८६८ मेट्रिक टन धान्य दुकानदारांनी अद्याप उचलले नाही. त्याचा परिणाम म्हणून गोदाम आणि दुकान यांठिकाणी धान्य पडून आहे.
१. शिधावाटप दुकानांवर धान्य देण्यापूर्वी त्या लाभार्थ्यांच्या हाताचे ठसे नोंदवून त्यांना त्या मासाचे धान्य वितरित केल्याची निश्चिती केली जाते, तसेच गोदामामधून उचललेले धान्य वाटप झाले कि नाही याची सर्व माहिती ‘पॉस मशिन’वर दिसते. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या शिधावाटप दुकानदारांकडे किती धान्य वाटपावाचून पडून आहे, याची ‘ऑनलाईन’ माहिती कळते. त्यामुळे धान्य घेऊन जात असलेल्या लाभार्थ्यांची ‘पॉस मशिन’वर नोंद होणे आवश्यक असते.
२. जिल्ह्यात ‘अंत्योदय योजने’चे ५४ सहस्र ३८४ कार्डधारक आहेत. त्यावर आधारित २ लाख ५५ सहस्र ५३२ लोकांपर्यंत प्रत्येक मासामध्ये अन्नधान्य पुरवठा होतो, तर प्राधान्य कुटुंब योजनेचे ३ लाख ५२ सहस्र २७४ कार्डधारक आहेत. त्यावर आधारित १७ लाख ४ सहस्र ११४ लोकांना धान्याचा पुरवठा होतो. मागील २ मासांपासून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना वेळेत स्वस्त धान्य मिळाले नाही.
संपादकीय भूमिकाप्रशासन याविषयी काही उपाययोजना काढणार नाही का ? धान्य खराब झाल्यास त्यास कुणाला उत्तरदायी धरायचे ? |