स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांनाच १९४७च्या फाळणीचा इतिहास प्रत्येक भारतियाने जाणून घ्यावा ! – राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे

राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे

फोंडा (गोवा) – यंदा भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि हे करतांनाच १९४७च्या फाळणीचा इतिहास प्रत्येक भारतियाने जाणून घेतला पाहिजे. फाळणी का झाली ? हे समजून घेतले पाहिजे आणि तरच या चुका पुढे टाळता येतील. इतिहास विसरणार्‍यांना तो इतिहास पुन्हा भोगावा लागतो, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी केले. फोंडा येथील सदर गणेशोत्सव मंडळाने ५ आणि ६ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाला गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी या २ दिवसांमध्ये श्री गणेशाची उपासना करण्याचे महत्त्व, मनुष्याने जीवन सार्थकी लावण्यासाठी श्री गणेशाकडून घ्यावयाचे गुण, लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देण्यामागील कारणे आणि गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिल्याने त्याची झालेली फलश्रुती यांविषयी उद्बोधक असे विवेचन केले. वर्ष १८९४ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केल्यानंतर विभागलेल्या हिंदूंचे झालेले अभूतपूर्व संघटन, त्यानंतर आलेल्या ‘प्लेग’च्या साथीच्या वेळी विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ‘प्लेग’पासून बचाव करण्यासाठी केलेले मोठे सामाजिक कार्य, गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणे आदी घटनांची त्यांनी सखोल विवेचनाद्वारे माहिती दिली. चेन्नई शहरातील पुलकाडू कॉलनीमध्ये श्री गणेशचतुर्थी उत्सव साजरा करण्याची अनुमती देण्याची मागणी करणारी याचिका तेथील महालक्ष्मी नावाच्या महिलेने मद्रास उच्च न्यायालयाकडे नुकतीच केली होती. यावर निवाडा देतांना मद्रास उच्च न्यायालयाने ‘कोईम्बतूर येथे मुसलमानबहुल भागात मुसलमान संघटनेच्या अनुमतीने गणेशोत्सव साजरा करा !’ असा निवाडा दिला आहे. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी या निवाड्याचा संदर्भ देत पुढील भीषण काळाविषयी भक्तांना सजग केले.

राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

ह.भ.प. चारुदत्त आफळे (उजवीकडे )यांना हिंदु जनजागृती समितीचा ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट देतांना श्री. उमेश नाईक

फोंडा – राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे  साधक श्री. उमेश नाईक यांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचा ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ त्यांना भेट देण्यात आला.